नातेवाइकांना भेटायला जाणे ठरले शेवटचे; बसच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:30 IST2026-02-07T19:28:32+5:302026-02-07T19:30:21+5:30
घनसावंगी तालुक्यातील मूर्ती टी-पॉइंटवर अपघात; परिसरात हळहळ

नातेवाइकांना भेटायला जाणे ठरले शेवटचे; बसच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू
कुंभार पिंपळगाव : लेकीच्या गावातील हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या एका वृद्ध महिलेवर काळाने घाला घातला. मानव विकास मिशनची बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मीराबाई देवराव गोरे (वय ५५, रा. रांजणीवाडी, ता. घनसावंगी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मूर्ती टी-पॉइंटजवळ घडला.
मीराबाई गोरे या दोन दिवसांपूर्वी आपल्या मोठ्या मुलीच्या गुंज (ता. घनसावंगी) या गावी अखंड हरिनाम सप्ताहासाठी आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्या आपला नातू अभिषेक अर्जुन गुंजकर याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच०४ एके ७१२५) साकळगाव येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाल्या. मूर्ती फाटा कॅनॉल रोडवर समोरून एसटी बस (एमएच ०६ एस ८७०५) येत असल्याचे पाहून नातवाने दुचाकी थांबवली.
मात्र, दुर्दैवाने याच वेळी मीराबाईंचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्याच क्षणी बसचे मागील चाक त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला. अपघाताची माहिती मिळताच मीराबाईंचे पती देवराव गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नीचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून त्यांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या अपघातामुळे रांजणी वाडी आणि गुंज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.