सावकार पीडित शेतकऱ्यांच्या स्वतंत्र याद्या देण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:13 IST2019-12-10T01:13:06+5:302019-12-10T01:13:55+5:30
सावकार पीडित शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात महसूल, सहकार विभागाने गतीमान पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

सावकार पीडित शेतकऱ्यांच्या स्वतंत्र याद्या देण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील सावकार पीडित शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात महसूल, सहकार विभागाने गतीमान पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. जाफराबाद येथील तहसीलदारांनी सावकार पीडित शेतक-यांच्या याद्या स्वतंत्ररीत्या सादर करण्याच्या सूचना तलाठ्यांसह संबंधित यंत्रणेला दिल्या असून, अहवाल आल्यानंतर अनुदानाचा निर्णय घेतला जाणार आहे.
शेती कसणा-या सावकार पीडित शेतक-यांना नुकसानीचे अनुदान मिळावे, यासाठी सावकारग्रसत शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे धाव घेण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिका-यांकडून, जिल्हा उपनिबंधकांकडे पत्र आले होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा उपनिबंधक आणि वरिष्ठस्तरावरून आलेल्या पत्रानुसार जाफराबाद तालुक्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी सावकार पीडित शेतक-यांच्या स्वतंत्र याद्या देण्याच्या सूचना तलाठ्यांसह संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. अनुदान वाटप करताना स्थळ पंचनाबा, ताबा पंचनाम्यासह इतर कायदेशीर बाबींची तपासणी करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक सावकार पीडित शेतकरी असलेल्या जाफराबार तालुक्यातील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार इतर तालुका प्रशासनानेही शेतक-यांच्या मागणीनुसार कायदेशीर प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे.