धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव १०० टक्के कमी होईल; देशमुखांनीही मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:54 IST2025-01-28T13:54:24+5:302025-01-28T13:54:45+5:30
Santosh Deshmukh Murder Case: पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव १०० टक्के कमी होईल; देशमुखांनीही मांडली भूमिका
Beed Murder Case: "उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पुरावे असल्यामुळेच चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असेल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास १०० टक्के यंत्रणांवरचा दबाव कमी होईल. कारण मागच्या १० दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे राजीनामा झाल्यास यंत्रणांवरील दबाव नक्कीच कमी होईल," अशी भूमिका मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मांडली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. अंजली दमानिया यांनी पुरावे दिले आहेत. आपली न्यायाची मागणी आहे. क्रूरकर्मी लोकांनी जी हत्या केली आहे, त्याबाबत न्याय मिळावा, अशी आपली मागणी आहे. तशा यंत्रणा मुख्यमंत्री साहेबांनी राबवल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींना आणि फरार असलेल्या एका आरोपीला अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी, यावर सर्वजण ठाम आहेत," असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धनंजय देशमुख हे जालना इथं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणातही सहभागी झाले आहेत. "सरकारने मनोजदादांच्या उपोषणाची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात," असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
दमानिया-अजित पवार भेटीत काय घडलं?
अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या हत्येशी संबंधित आरोपी आणि अन्य लोकांच्या कथित सहभागाविषयीची कागदपत्रे तसेच अन्य पुरावे त्यांनी या भेटीत अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बीड व धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. दमानिया यांनीही या प्रकरणात मुंडे यांनाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे दमानिया यांच्या या भेटीनंतर मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.