जालना: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. "आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणारच, १०० टक्के मुंबईत जाणार आणि आझाद मैदानावर उपोषण करणारच," असं त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर हायकोर्ट काय म्हणाले?मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मात्र, न्यायालयाने सरकारला नवी मुंबईतील खारघर किंवा इतर कोणत्याही योग्य ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी देण्याची मुभा दिली आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनाची दिशा आता सरकार देणाऱ्या परवानगीवर अवलंबून असणार आहे. मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम असलेल्या जरांगेंना न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे, ते आता सरकारकडून मिळणाऱ्या पर्यायी जागेच्या परवानगीवर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मुंबईतील आंदोलन शंभर टक्के होणारच: मनोज जरांगेदरम्यान, हायकोर्टाच्या निर्णयानंतर जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "सरकारकडे दोन कायदे आहेत का? न्यायदेवतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे. त्यावर मला काहीच बोलायचे नाही. मात्र, आमचे वकील या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागतील. आझाद मैदान का नाही? यावर न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, अशी आम्हाला खात्री आहे." जरांगे यांनी स्पष्ट केलं की, लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करत आम्ही मुंबईतील आंदोलन करणारच. सरकारला या आंदोलनाला परवानगी नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही. मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनासाठी कोर्टाने परवानगी नाकारल्यामुळे मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
असे असेल मुंबईचे मराठा आंदोलन: २७ ऑगस्ट : अंतरवाली सराटी, शहागड फाटा,साष्टपिंपळगाव, आपेगाव, पैठण, घोटण, शेवगाव, मिरी मका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळे फाटा ते शिवनेरी किल्ला, जुन्नरला मुक्काम.२८ ऑगस्ट : राजगुरुनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदान.२९ ऑगस्ट : सकाळी उपोषणाला प्रारंभ.