'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:52 IST2025-09-12T12:50:27+5:302025-09-12T12:52:41+5:30
लातूर जिल्ह्यात ओबीसी तरुणाने जीवन संपविल्याचा घटनेवर मनोज जरांगे पाटील भावूक

'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): "मी जरी अशिक्षित असलो तरी तुम्हाला रडकुंडीला आणले. तुला मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नव्हते, पण त्या विचारांवर मी पाणी फिरवले," अशा शब्दांत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या 'अशिक्षित' टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अंकुशनगर येथील निवासस्थानी त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले, "मी अशिक्षित असताना जर तुम्हाला रडकुंडीला आणले, तर आमचे सुशिक्षित लोक बोलायला लागले तर तुझे काय होईल याचा विचार कर." भुजबळांना हे चांगलेच माहीत आहे की, मी अशिक्षित आहे की सुशिक्षित. मी जीआर काढला तरी त्यांना सुधारता येत नाही, ते पूर्णपणे पागल झाले आहेत, असा पलटवारही जरांगे यांनी केला.
मराठा नेत्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी
जरांगे यांनी यावेळी मराठा आमदार आणि खासदारांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. "मराठ्यांच्या सर्व नेत्यांना प्रश्न विचारला गेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी सांगितले पाहिजे की, आम्हाला १० टक्के एसईबीसी आरक्षण पाहिजे, पण ते ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रकाश आंबेडकरांना विनंती
यावेळी जरांगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. "मी प्रकाश आंबेडकर यांना मानतो, ते हुशार आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. त्यांनी एखादा सल्ला दिला तर तो ऐकायला पाहिजे. मात्र, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून तुम्ही एका जातीच्या बाजूने बोललात आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात गेलात, असा संदेश जाऊ नये. तुम्ही सगळ्या जातींना सारखे धरावे," अशी विनंती जरांगे यांनी केली.
'आत्महत्येवर राजकारण करू नका'
ओबीसी समाजातील तरुणाच्या आत्महत्येवर बोलताना जरांगे पाटील भावूक झाले. "मराठा असो की ओबीसी, कोणत्याही गरीब लेकराने आत्महत्या करू नये," असे आवाहन त्यांनी केले. राजकीय नेते अशा घटनांवर लगेच राजकारण करतात. भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्या सांत्वन भेटीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "या लोकांना लोकांच्या लेकराबाळांचे जीवन गेल्याची पर्वा नसते, त्यांना फक्त राजकारण करायचे असते. आम्ही त्या गरीब कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत."