जालन्यात भीषण अपघात! दुचाकीस बसने पाठीमागून जोरदार धडक दिली; तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:54 IST2025-09-17T13:50:39+5:302025-09-17T13:54:55+5:30
अपघात झाल्यानंतर बसचालक बस घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.

जालन्यात भीषण अपघात! दुचाकीस बसने पाठीमागून जोरदार धडक दिली; तरुण जागीच ठार
केदारखेडा ( जालना) : केदारखेडा-राजूर रोडवरील बानेगाव पाटीजवळ एका भरधाव बसने दुचाकीस्वार तरुणाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नामदेव धोंडीबा गाडेकर (वय ३८, रा. देऊळगाव ताड) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. १७) सकाळी ८ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव गाडेकर आणि त्यांचा भाऊ दत्तु गाडेकर हे दोघे भाऊ सकाळी एकत्र घरातून बाहेर पडले होते. बानेगाव पाटीवर दत्तु यांची चहाची हॉटेल आहे. नामदेव यांनी भावाला हॉटेलवर सोडले आणि शेतातील पिकांसाठी औषध आणण्याकरिता आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच.०५ ए.एल.२७३१) निघाले होते.
नामदेव आपल्या दुचाकीवरून निघणार तोच भोकरदनकडून भरधाव वेगाने येणाऱ्या जळगाव-परळी बसने (क्र. एम.एच.१४ एल एक्स.७५९१) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, नामदेव गाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बसचालक बस घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बस चालकास राजूर येथे थांबविण्यात आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह राजूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. नामदेव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर आणि गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.