जालन्यात भरदिवसा पाच राऊंड फायर, तरुणाच्या हत्येनंतर तणावाची स्थिती
By विजय मुंडे | Updated: December 11, 2023 19:41 IST2023-12-11T19:41:02+5:302023-12-11T19:41:54+5:30
इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयात

जालन्यात भरदिवसा पाच राऊंड फायर, तरुणाच्या हत्येनंतर तणावाची स्थिती
जालना : शहरातील मंठा चौफुली परिसरात सोमवारी दुपारी अज्ञात तीन मारेकऱ्यांनी पिस्तुलातून पाच राऊंड फायर करीत गजानन तौर याची निर्घृण हत्या केली. या घटनेने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून, इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
गजानन तौर त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सोमवारी दुपारी रामनगर साखर कारखान्याकडून जालना शहराकडे येत होते. त्यांचे वाहन मंठा चौफुली भागात आले असता अज्ञात तीन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी एकाने पिस्तुलातून पाच राऊंड फायर केले. गंभीर जखमी झालेल्या गजानन तौर यांना प्रथम एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
नातेवाईकांच्या मागणीनुसार इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेनंतर शासकीय रूग्णालयात हजारो युवकांचा जमाव जमा झाला होता.घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.