'पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार, ही आरपारची लढाई'; मनोज जरांगे-पाटील यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 21:46 IST2023-11-01T21:46:13+5:302023-11-01T21:46:22+5:30
आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

'पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार, ही आरपारची लढाई'; मनोज जरांगे-पाटील यांचं विधान
आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आम्ही आरक्षणासाठी शांततेत लढा देणार आहोत. सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार नाही, असं जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई आरपारची असल्याचेही त्यांनी सांगितले.
सहा ते सात टप्प्यात आंदोलन
मराठा आरक्षणाचा लढा शांततेत लढायचा आहे. एकूण सहा ते सात टप्प्यात आपले आंदोलन होणार आहे. शेवटच्या टप्प्यापूर्वीच आपल्याला आरक्षण मिळेल. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. उद्रेक करू नये, शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.