चार हजार शेतकरी नुकसान अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:30+5:302021-02-09T04:33:30+5:30

परतीच्या पावसामुळे धावडा महसूल मंडळातील धावडासह भोरखेडा, पोखरी, मेहेगाव, वाढोणा, विझोरा, जाळीचादेव, वालसावंगी परिसरातील ७ हजार १५२ शेतकऱ्यांच्या मका, ...

Four thousand farmers await loss grant | चार हजार शेतकरी नुकसान अनुदानाच्या प्रतीक्षेत

चार हजार शेतकरी नुकसान अनुदानाच्या प्रतीक्षेत

परतीच्या पावसामुळे धावडा महसूल मंडळातील धावडासह भोरखेडा, पोखरी, मेहेगाव, वाढोणा, विझोरा, जाळीचादेव, वालसावंगी परिसरातील ७ हजार १५२ शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, कपाशी आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेंतर्गत नऊ गावांपैकी सात गावांच्या ३३२० शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर जमा झाले; परंतु धावडा, वालसावंगी येथील चार हजार १५२ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप बँकेकडे जमा झालेले नाही. तलाठी संतोष ठुबे, नंदकिशोर कटारे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी याद्या तहसील कार्यालयात जमा केल्या असून, लहान गावांचे अनुदान वाटप झाल्यानंतर मोठ्या गावांची यादी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धावडा शाखेतून भोरखेडा येथील ४९६ शेतकऱ्यांना, पोखरी येथील २२५ शेतकऱ्यांना, मेहगावच्या ५०२ शेतकऱ्यांना, वाढोणा येथील ७७१ शेतकऱ्यांना, विझोरा येथील ४४४ शेतकऱ्यांना, जाळीचादेव येथील ६१ शेतकऱ्यांना अशा एकूण २५०२ शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. वडोद तांगडा येथील ८१८ शेतकऱ्यांची यादी लावली असून, आज, मंगळवारपासून वाटप सुरू होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

अनुदान आल्यानंतर वाटप

बँकेकडे ज्या गावातील शेतकऱ्यांचे अनुदान प्राप्त झाले, त्या गावातील लाभार्थ्यांना आदी नुकसान अनुदान वाटप करण्यात आले आहे. धावडा, वालसावंगी येथील शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप आलेले नाही. ते अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करून त्याचे नियमानुसार वाटप केले जाईल.

ज्ञानेश्वर पाडळे

शाखाधिकारी, जिल्हा बँक, धावडा

Web Title: Four thousand farmers await loss grant