रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या ४१ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर; तीन टप्प्यात मायदेशी येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:36 IST2026-04-08T12:34:35+5:302026-04-08T12:36:37+5:30
‘अकासा एअर’ने उड्डाण अचानक रद्द करून प्रवाशांना अडचणीत टाकले होते.

रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या ४१ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर; तीन टप्प्यात मायदेशी येणार
भोकरदन (जि. जालना) : सौदी अरेबियातील रियाध येथे अडकलेल्या भोकरदन तालुक्यातील ४१ प्रवाशांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तक्षेपामुळे एअरलाइनला माघार घ्यावी लागली आहे. ‘अकासा एअर’ने उड्डाण अचानक रद्द करून प्रवाशांना अडचणीत टाकले होते. मात्र सुळे यांच्या ट्विटनंतर परिस्थिती पालटली.
रियाधहून मुंबईकडे सोमवारी (ता. ६) येणारे उड्डाण रद्द झाल्यामुळे भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील सर्व प्रवासी परदेशात अडकून पडले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सुळे यांनी थेट परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच रियाध येथील भारतीय दूतावासाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रवाशांची माहिती जाहीर केली आणि प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. यानंतर रियाधमधील भारतीय दूतावास तत्काळ सक्रिय झाला. प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे दूतावासाने स्पष्ट करत एअरलाइनशी समन्वय सुरू केल्याचे सांगितले. अखेर ‘अकासा एअर’ला प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली. सुरुवातीला एअरलाइनकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. सुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे व त्यांचे बंधू सुधाकर दानवे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न सुटला.
एअरलाइनने काय म्हटले
एअरलाइनने प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रियाध येथील उड्डाण सेवा अधूनमधून स्थगित करण्यात आली आहे. प्रभावित प्रवाशांना याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना योग्य माहिती मिळाली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
३ टप्प्यांत परतणार ४१ प्रवासी
८ एप्रिल : जेद्दा ते मुंबई -१२ प्रवासी
९ एप्रिल : जेद्दा ते मुंबई -१५ प्रवासी
१० एप्रिल : जेद्दा ते मुंबई -१४ प्रवासी
आमच्या अडचणीची दखल घेऊन आम्हाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सुप्रिया यांचे मनःपूर्वक धन्यवाद. एअरलाइनकडून प्रतिसाद मिळत नव्हता; मात्र त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे व सुधाकर दानवे यांच्या सहकार्यामुळे आम्हांला मोठा दिलासा मिळाला.
-तालेब शेख, प्रवासी
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही मदत
भोकरदन तालुक्यातील ४१ प्रवाशी रियाधमध्ये अडकल्याची माहिती जफर भाई व शेख हकीम या दोन कार्यकर्त्यांनी दानवे यांना दिली. ते दोघेसुद्धा या प्रवासात अडकले होते. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकरणात लक्ष घातले व परराष्ट्र मंत्रालय व विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रवाशांना परत येण्यासाठी सहकार्य केले. काही प्रमाणात आर्थिक मदतसुद्धा दिली आहे.