अखेर पाचवीला पुजलेली ऊसतोडीच जिवावर बेतली; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:59 IST2025-02-19T13:59:07+5:302025-02-19T13:59:23+5:30
जालन्याकडे येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला

अखेर पाचवीला पुजलेली ऊसतोडीच जिवावर बेतली; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी
- राहुल वरशिळ
जालना : घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आई-वडिलांपासून परगावी जाऊन ऊसतोडीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या दुचाकीला (क्र. एमच २१ सीई ०९८३) शुक्रवारी लोंढेवाडीजवळ पिकअप (क्र. एमएच-२८, एबी-२६३९) गाडीने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एकाची पत्नी जखमी झाली. संजय साळवे (वय ४२), विष्णू वरशिळ (वय ४८, दोघेही रा. देळेगव्हाण, ता. जाफराबाद) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. संजयची पत्नी छाया (वय ३६) गंभीर जखमी आहे. त्यामुळे आई-वडिलांपासून पाचवीलाच पुजलेल्या ऊसतोडीनेच जीव घेतल्याची चर्चा गावात सुरू होती.
आता आई रुख्मिणीबाई व वडील जगन साळवे गावातच मोलमजुरी करतात. त्यांची दोन्ही मुले ऊसतोडीला जातात. यंदा घनसावंगी तालुक्यात गेलेला धाकटा मुलगा संजय दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त पत्नीसह घरी आला होता. काम आटोपून शुक्रवारी पत्नीसह अन्य एकाला दुचाकीवर घेऊन जात होता. यादरम्यान, लोंढेवाडीजवळ जालन्याकडे येणाऱ्या पिकअपने त्यांना जोराची धडक दिली. यात संजयच्या डोक्यावरून चाक गेले, तर विष्णूच्या डोक्याला मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. संजयची पत्नी छाया जखमी असून, तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार सुरू आहेत. संजयच्या पश्चात आई-वडील, चार बहिणी, भाऊ, पत्नी, मुलगा, भावजई, पुतण्या असा परिवार आहे.
मेहुणीला पैसे देण्यासाठी आले होते गावी
पत्नी छायाच्या बहिणीची मुलगी प्रसूती झाल्यामुळे मेहुणीने संजयकडे पैशाची मागणी केली होती. परंतु, पैसे नसल्याने संजय पत्नीसह दोन दिवसांपूर्वी देळेगव्हाण येथे आला होता. छाया हिने खासगी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर संजयने हातउसनवारी म्हणून दहा हजार रुपये घेऊन शुक्रवारी पुन्हा ऊसतोडीकडे निघाले होते. दरम्यान, हा अपघात झाला अन् होत्याचं नव्हतं झालं.
साेबत गेलेे; पण घरीच आले नाही
मी तुम्हाला सोडविण्यासाठी येतो, असे म्हणून विष्णू वरशिळ (पंथ) हे त्यांच्या सोबत गेले होते. मात्र, रस्त्यातच काळाने घाला घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गावात पंथ या नावाने ते परिचत होते. त्यांच्या पश्चात वडील, पाच भाऊ, दोन बहिणी, भावजई, पुतण्या, काका असा परिवार आहे.
पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर
गेल्या दीड वर्षापूर्वी मोठ्या मुलाचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्या दु:खातून छाया कसेबसे सावतरत नाही, तोच पुन्हा पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.