जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:54 IST2025-05-13T17:52:26+5:302025-05-13T17:54:17+5:30
सदर प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
बदनापूर - येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकू, लोखंडी पाईपने बाप लेकावर हल्ला केल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सविस्तर माहिती अशी की, बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील अशोक अंबीलढगे व विष्णू अंबीलढगे शेजारी शेजारी राहतात. या दोन सख्या भावात मुलीचे लग्नासाठी काढलेल्या पैशावरून वाद सुरू होता.आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी व तिची जावू यांच्यामध्ये भांडण झाले व हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.
त्यानंतर दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास फिर्यादीची जावू मीनाबाई हिचे जालना येथील नातेवाईक हे बदनापूर येथील शंकरनगर भागात आले असता, तेथे झालेल्या भांडणांमध्ये चाकू लोखंडी पाईप यांच्या साह्याने अशोक येडुबा अंबीलढगे व त्यांचा मुलगा यश अशोक अंबीलढगे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली. तसेच घटनास्थळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी भेट दिली.