शेतकऱ्यांनो, आता या 'दगाबाज' सरकारचाच 'पंचनामा' करा! उद्धव ठाकरेंचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:40 IST2025-11-08T14:38:41+5:302025-11-08T14:40:23+5:30
'कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मतबंदी!' उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौऱ्यातून सरकारवर हल्ला

शेतकऱ्यांनो, आता या 'दगाबाज' सरकारचाच 'पंचनामा' करा! उद्धव ठाकरेंचा एल्गार
परतूर/ढेंगळी पिंपळगाव (जालना/परभणी): अतिवृष्टीमुळे आयुष्य संपले अशा स्थितीत असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "शेतकऱ्यांवर झालेले कर्ज आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. या 'दगाबाज' राज्य सत्कारचा पंचनामा करा आणि जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत 'मतबंदी' करा," असे आक्रमक आवाहन ठाकरे यांनी केले.
परतूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात माल विकल्याशिवाय या सरकारला खरेदी केंद्र सुरू करता येत नाही. सरकारने आकर्षक शब्दांत पॅकेज घोषित केले, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. 'नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी केवायसी करा' असे सांगून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. पीक विमा ही शेतकऱ्यांची मोठी थट्टा आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत, अधिकारी त्यांना मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहेत. अधिकारी दगाबाजपणे वागत असतील, तर शिवसैनिकांनी त्यांना थेट मुख्यमंत्री यांच्याकडे घेऊन जावे लागेल." असा इशारा ठाकरे यांनी दिला.
मुख्यमंत्री बिहारमध्ये, शेतकऱ्यांशी माणुसकीने वागा!
ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. "मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कशा कळणार? ते तर बिहारमध्ये प्रचार करण्यात व्यस्त आहेत. मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून तुमच्या सोबत संवाद साधायला आलो आहे, माझ्या हातात काहीही नसतानासुद्धा! शेतकऱ्यांच्या हितासाठी माणुसकी म्हणून हा लढा उभा करणार आहे."
'भाजपने पाठीत खंजीर खुपसला!'
ढेंगळी पिंपळगाव (परभणी) येथे बोलताना ठाकरे यांनी भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली. "लॉकडाउनमध्ये जगाचा पोशिंदा काम करत होता, म्हणून आर्थिक चक्र सुरू राहिले. आता शेतकरी हक्काचे मागतोय, तर त्याला अडवले जात आहे."
... म्हणून अजित पवार मजेत आहेत
शेतकरी हात-पाय हलवतोय म्हणून अजित पवार (उपमुख्यमंत्री) मजेत आहेत. शेतकऱ्यांनी वठणीवर आणल्याशिवाय कर्जमुक्ती होणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत मतबंदीचे होर्डिंग्ज लावा आणि या दगाबाज सरकारला घरी बसवा," असे आक्रमक आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.