जालन्यात भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाची शेतकरी कुटुंबास जबर मारहाण; खड्ड्यात पुरण्याचा केला प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:29 IST2019-01-28T20:26:19+5:302019-01-28T20:29:33+5:30
ही घटना जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे आज सकाळी घडली आहे.

जालन्यात भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाची शेतकरी कुटुंबास जबर मारहाण; खड्ड्यात पुरण्याचा केला प्रयत्न
जालना : शेतीच्या वादातून एका शेतकऱ्यास त्याच्या कुटुंबातील तीन महिलांना भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी साथीदारांच्या मदतीने जबर मारहाण केली. यानंतर खड्ड्यात जिवंत पुरण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप या कुटुंबाने केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे आज सकाळी घडली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून जालन्यात भाजप कार्यकारणीची बैठक सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड व कृष्णा खांडेभराड यांच्या गट क्र. ४१७ मधील शेताचा कोर्टात वाद चालू आहे. आज सकाळी ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या शेतात भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर व अन्य १० ते २० जणांनी येत पोकलेनच्या मदतीने विहीर खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी खांडेभराड यांनी, या जमीनीचा वाद चालू आहे. त्यावर अद्याप निकाल लागलेला नाही. असे सांगून काम थांबविण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त भवर व त्यांच्या साथीदाराने गंगा बळीराम खांडेभराड, रेणुका कृष्णा खांडेभराड, प्रयाग विष्णू खांडेभराड व विठ्ठल नामदेव खांडेभराड यांना जबर मारहाण करून जखमी केले. तसेच तेथे असलेल्या एका खड्ड्यात या चौघांना पुरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी शेतकरी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी ज्ञानेश्वर खांडेभराड यांनी दिलेल्या फियार्दीवरून टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून रावसाहेब भवर यांना अटक करण्यात आली आहे. तपास सपोनि शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आनंदा मोहीते, पंडीत गवळी आदी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पहा व्हिडीओ :