बँकेकडून तगादा, शेतकऱ्याने संपवले जीवन; ८ तास मृतदेह पोलिस ठाण्यात, मॅनेजरवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:18 IST2024-12-09T15:17:49+5:302024-12-09T15:18:06+5:30
शेतकरी आत्महत्याप्रकरणी करंजळा येथील बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

बँकेकडून तगादा, शेतकऱ्याने संपवले जीवन; ८ तास मृतदेह पोलिस ठाण्यात, मॅनेजरवर गुन्हा
गोंदी (जि. जालना) : अंबड तालुक्यातील करंजळा येथील येथील शेतकरी कृष्णा विनायक आमटे (४०,रा. करंजळा, ता. अंबड) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान उघड झाली होती. एसबीआय बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या कर्जाच्या तगाद्यामुळे कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. नातेवाइकांनी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गोंदी पोलिसांकडे केली होती. तब्बल आठ तास मृतदेह गोंदी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्यानंतर यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या महाकाळा येथील शाखा व्यवस्थापक गोविंद शिंदे तसेच वैभव दहीवाळ यांच्यावर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा आमटे हे शनिवारी रात्री जेवण करून झोपले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते कोणाला काहीही न सांगता त्यांच्या शेतात गेले होते. बराच वेळ झाल्यानंतर ते परत आले नसल्याने त्यांचे नातेवाईक शेतात गेल्यानंतर त्यांना कृष्णा आमटे हे लिंबाच्या झाडाला मफलरच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाइकांनी त्यांना जालना येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मात्र, नातेवाइकांनी अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट गोंदी पोलिस ठाण्यात आणून बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी कृष्णा आमटे यांचे भाऊ विकास विनायक आमटे यांच्या फिर्यादीवरून एसबीआय बँकेचे व्यवस्थापक गोविंद शिंदे व वैभव दहीवाळ यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जासाठी तगादा लावल्याचा आरोप
कृष्णा आमटे यांनी स्टेट बँक इंडियाच्या महाकाळा शाखेतून काही महिन्यांपूर्वी घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते. कर्ज असल्याने त्याचे बँकेत जाणे-येणे होते. शनिवारी सकाळी कृष्णा आमटे हे एसबीआयच्या महाकाळा येथील शाखेत गेले होते. यावेळी बँकेचे पैसे नजर चुकीने कृष्णा आमटे यांच्याकडे आले होते. बँक मॅनेजर व एका व्यक्तीने धमकावल्याचा आरोप कृष्णा आमटे यांचे भाऊ विकास आमटे यांनी गोंदी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. कर्ज आताच भरा असा तगादा लावल्यामुळे मानसिक तणावातून कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे.