प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंना मानाचा 'बाबासाहेब आकात' पुरस्कार जाहीर; जालन्यात सोहळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:08 IST2026-04-01T15:07:35+5:302026-04-01T15:08:26+5:30
३ एप्रिलला परतूरमध्ये रंगणार सोहळा, नक्की काय आहे पुरस्कार?

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंना मानाचा 'बाबासाहेब आकात' पुरस्कार जाहीर; जालन्यात सोहळा!
परतूर (जि. जालना): जालना जिल्ह्यातील दिवंगत नेते बाबासाहेब आकात यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा मानाचा पुरस्कार यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. येत्या ३ एप्रिल रोजी परतूर येथे एका विशेष सोहळ्यात एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षण, कला आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा हा पुरस्काराचा यंदाचा चौथा वर्ष आहे.
मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मंडळाचे अध्यक्ष कपिल आकात भूषवणार आहेत. सकाळी १० वाजता आयोजित या सोहळ्यासाठी विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे, प्रसिद्ध कवी डॉ. दासू वैद्य, प्राचार्य डॉ. भागवत कटारे आणि प्राचार्य डॉ. शिवाजी मदन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
नागराज मंजुळेंच्या निवडीने सोहळ्याची रंगत वाढणार
भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी सिनेमाची नवी लाट निर्माण करणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या निवडीमुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 'पिस्तुल्या', 'फॅंड्री', 'सैराट' आणि 'झुंड' यांसारख्या कलाकृतींतून त्यांनी मांडलेले सामाजिक वास्तव अतुलनीय आहे. अशा प्रगल्भ कलावंताचा जालन्याच्या मातीत गौरव होत असल्याने कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ३ एप्रिल रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.