'फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकावे, हा सर्वांचा नाश करतोय!'; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:47 IST2025-09-09T17:42:54+5:302025-09-09T17:47:02+5:30

'जीआरमध्ये हेराफेरी करू नका,' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा.

'Fadnavis should put Bhujbal in jail, he is destroying everyone!'; Manoj Jarange's attack | 'फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकावे, हा सर्वांचा नाश करतोय!'; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

'फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकावे, हा सर्वांचा नाश करतोय!'; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

- पवन पवार
जालना:
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरला विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. अंकुशनगर महाकाळा येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत थेट हल्लाबोल करत 'तू सरकारचा बाप झालास का?' असा सवाल केला. तसेच, मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी झाल्यास सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

'हा जीआर खूप महत्त्वाचा'
जरांगे म्हणाले की, "भुजबळ यांनी जीआरविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे, मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहिले आहे, याचा अर्थच हा जीआर किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध होते. ज्यांना काहीच अक्कल नाही, तेच या जीआरचा विरोध करत आहेत. हा जीआर ४०-५० वर्षांनी निघाला आहे, हे आरक्षण इतके सोपे असते तर मराठा समाजाचे कल्याण कधीच झाले असते."

'परस्पर जीआर काढला नाही, कॅबिनेटने काढला आहे'
भुजबळ यांनी 'हा जीआर परस्पर काढला' असा आरोप केला होता, त्याला जरांगे यांनी सडेतोड उत्तर दिले. "हा जीआर परस्पर कसा काढतील? तो कॅबिनेटने काढला आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला आहे. तुला एकट्यालाच अक्कल आहे का? तू दीड छटाक पुस्तक वाचले म्हणजे लय शहाणा झाला का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्यांना अक्कल नाही का? तू काय घटना समितीचा अध्यक्ष आहे का? तू राष्ट्रपती आहे का?" अशा शब्दांत जरांगे यांनी भुजबळांवर वैयक्तिक टीका केली.

'फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकावे'
जरांगे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, "हा एकटा सरकारला वेठीस धरतोय, म्हणजे हा काय सरकारचा मालक झाला का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला जेलमध्ये टाकले पाहिजे, त्याला बाहेर ठेवू नये. हा एकटा माणूस सरकारला आणि ओबीसी-मराठ्यांचा नाश करत आहे."

'जीआरमध्ये हेराफेरी करू नका, अन्यथा...'
यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. "आमच्या जीआरमध्ये अजिबात हेराफेरी करायची नाही आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची. जर हेराफेरी केली तर मी पण रस्त्याने फिरू देणार नाही सरकारला. त्यानंतर पुन्हा विदर्भासारखी परिस्थिती झाली असे म्हणू नका." त्यामुळे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: 'Fadnavis should put Bhujbal in jail, he is destroying everyone!'; Manoj Jarange's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.