चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; पती समोर पत्नी अन् पाच वर्षांच्या चिमुकलीने प्राण सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:11 IST2025-05-19T13:10:37+5:302025-05-19T13:11:08+5:30
Jalna Car Accident: मायलेकीचा ठरला शेवटचा प्रवास; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; पती समोर पत्नी अन् पाच वर्षांच्या चिमुकलीने प्राण सोडले
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कार उलटून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळे ते सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव फाटा येथे आज, सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. रोहिणी अमर चव्हाण ( ४०), नुरवी अमर चव्हाण ( ५, रा. स्पंदन नगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत मायलेकीचे नाव आहे. अपघात एवढा भीषण होता की गाडी चक्काचूर झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील स्पंदन नगर येथे राहणारे चव्हाण कुटुंब बीडकडे कारमधून ( क्रमांक एम एच 20 सी एस 4422) आज सकाळी रवाना झाले होते. भरधाव वेगाने जात असताना सकाळी साडेसात वाजता धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव पाटीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या लगतच्या खड्ड्यात जाऊन उलटली. या भीषण अपघातात रोहिणी अमर चव्हाण आणि नुरवी या मायलेकीचा जागेवर मृत्यू झाला. तर कारमधील अमर बाबुराव चव्हाण वय 47, प्रदीप बाबुराव चव्हाण वय 45, विश्रांती प्रदीप चव्हाण वय 40,कमलबाई बाबुराव चव्हाण वय 60, हे रुद्रांश प्रदीप चव्हाण वय 02 हे इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन कारमधून मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. यातील गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले तर किरकोळ जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.