'घरं जाळण्याचं स्वप्न पाहू नका,अन्यथा...', मनोज जरांगेंचा ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:48 IST2025-09-22T18:47:36+5:302025-09-22T18:48:37+5:30
'नुकसान लाखांचं, मदत ३ हजारांची...' अतिवृष्टीच्या मदतीवरूनही जरांगे यांनी सरकारला सुनावले.

'घरं जाळण्याचं स्वप्न पाहू नका,अन्यथा...', मनोज जरांगेंचा ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागण्याच्या घटनेवरून सुरू झालेल्या वादात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. “माझं घर जाळण्याचं स्वप्न पाहू नका. छगन भुजबळ यांनी घरं जाळायला सांगितले असेल. जर घरं जाळायची स्वप्न पाहिली, तर तुमच्या घरात कुंकू लावायला माणसं राहणार नाहीत,” असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “असले हीजडे धंदे आम्ही करत नाही. आम्ही मराठ्यांची अवलाद आहोत, आम्ही समोरासमोर करतो.” रविवारी रात्री वाघमारे यांची गाडी जाळली गेल्याचा आरोप त्यांनी जरांगे यांच्या समर्थकांवर केला होता आणि “जर जरांगे यांचे घर जाळले, तर आम्हाला काही म्हणू नका,” असा इशाराही दिला होता. यावर जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
‘मुंडेंना रोजगार हमीचं काम द्या’
धनंजय मुंडे यांनी ‘मला काही काम द्या,’ अशी मागणी केली होती. यावर जरांगे पाटील यांनी मुंडेंवर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, “धनंजय मुंडेंना रोजगार हमीचं काम द्या, त्यांना बराशी खोदायला पाठवा.” यावेळी त्यांनी अजित पवार यांनाही सोडले नाही. “फक्त मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर अजित दादांनाही सोडणार नाही, त्यांचाही कार्यक्रम लावणार,” असा इशारा त्यांनी दिला. छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “तो स्वतः लोकांकडून फुकटात काम करून घेतो आणि नंतर अलीबाबासाठी मैदान मोकळं ठेवतो.”
‘भुजबळ नेहमी वाद लावतो, त्याचे पाप त्याला भोगावे लागेल’
छगन भुजबळांवर पुन्हा एकदा टीका करताना जरांगे म्हणाले, “त्यांना काय येतं दुसरं. या पापाची फेड करावी लागेल. माझ्या डोक्यावर जनतेचा हात आहे, तर तुमच्या डोक्यावर पापाचा हात आहे. नेहमी वाद लावले, तुम्हाला फार भोगावे लागणार आहे.”
‘काँग्रेसवाल्यांना मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल’
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर बोलताना त्यांनी सरकारला मदतीवरून सुनावले. “नुकसान लाखांचं आणि मदत ३ हजारांची असं सरकारने करू नये. निधीची अडचण सांगू नका,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. “त्याला फार बुळबुळ सुटली आहे. काँग्रेसवाल्यांना मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल. तुमचं पोट भरलेलं दिसत नाही. तुमचा महाराष्ट्रातून सुपडा साफ करू, तुम्हाला सगळं गुंडाळून दिल्लीला न्यावं लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.