Discharge of water from Kedarkheda Kolhapuri Dam by 5 cusecs | केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यातून ५५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग

केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यातून ५५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : येथील पूर्णानदीच्या पात्रातील पाण्यात शनिवारी रात्री अचानक मोठी वाढ झाल्याने येथील कोल्हापुरी बंधा-यातून ५५०० क्युसेस वेगाने पाणी वाहत आहे.
केदारखेडा परिसरात शनिवारी सकाळपासूनच रिपरिप पावसाला सुरूवात झाली होती. सायंकाळी याचा जोर वाढला. शिवाय गिरजा व पूर्णानदीच्या वरच्या भागात देखील जोरदार पाऊस झाला. यामुळे पूर्णा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झालेली आहे. केदारखेडा मंडळात शनिवारी ३८ मिमी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. केदारखेडा कोल्हापुरी बंधा-यावर यंदा प्रथमच पूर्ण गेट टाकूण आठ दिवसांपूर्वी पाणी बंधा-यामध्ये पूर्ण क्षमतेने अडविण्यात आले होते.
यात शनिवारी नदीच्या पाण्यात वाढ झाली. पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात केर- कचरा वाहून आला. यामुळे बंधा-यातून पाण्याचा विसर्ग मोकळा होण्यास व्यत्यय येत होता. यातून काही धोका होऊ नये, यासाठी रविवारी सकाळी जलसंधारण विभागातर्फे बंधा-यात अडकलेला केर- कचरा काढण्यात आला. यानंतर पाण्याचा मोकळा विसर्ग झाला. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव, अंबादास सहाणे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
परतीच्या पावसाने जुई नदीला पूर; धरण ओसांडले
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूरसह कठोरा बाजार, वाकडी, कुकडी, आन्वा, कल्यानी, मूर्तळ, देहेड, वडशेड, दगडवाडी, तळणी परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे जुई धरण ओव्हरफ्लो झाल्याने जुई नदीला रविवारी पूर आला होता.
दानापूर येथील आशपाक कुद्बोद्दीन शेख, किशोर पवार यांच्या शेतात गावातील पाणी शिरल्याने काढणी केलेल्या मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Discharge of water from Kedarkheda Kolhapuri Dam by 5 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.