घरफोड्या करणारे डिच्चू टोळीचे सराईत गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:50 IST2018-11-18T00:50:02+5:302018-11-18T00:50:18+5:30
शहरात ४ घरफोड्या करणाऱ्या डिच्चु टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

घरफोड्या करणारे डिच्चू टोळीचे सराईत गुन्हेगार अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात ४ घरफोड्या करणाऱ्या डिच्चु टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. किशोर बाळू खंदारे, गणेश शंकर शिंदे (दोघे, रा. जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ क्रुझर जिपसह ७ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालना शहरातील मस्तगड येथील उढाण कॉम्प्लेकस येथे असलेल्या अजय स्वरुपंचद गांग यांच्या घरी किशोर खंदारे व त्याचा साथीदार गणेश शिंदे यांनी घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शिर्डी येथून ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, शहरातील उढाण कॉम्पलेक्स येथील घर फोडून घरातील रोख रक्कम, दागीने व लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २५,००० रुपये रोख, एक लॅपटॉप ४५,००० रुपये असा एकूण ७०,००० हजारांचा माल जप्त केला. दरम्यान, अधिक चौकशी केली असता, त्यांनी जालना शहरात तीन घरफोड्या केल्याची कबूली दिली. बालाजी नगर येथील शेख अकबर शेख ईसाक यांच्या घरातून सोन्याचे दागिन्यांसह ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरला. तसेच सोनलनगर येथील ढालराज तिपय्या म्हेत्रे यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यासह ४५ हजारांचा माल लंपास केला होता.
माऊली नगर येथील कृष्णा माणीकराव जाधव यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह ६० हजारांचा माल लंपास केला. त्याचबरोबर देहेडकरवाडी येथून क्रुझर जिप नेल्याची कबुली त्यांनी दिली.
त्यांच्याकडून चार घरफोड्यातील २ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने व एक क्रुझर जिप ५ लाख रुपये असा ७ लाख २९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. दरम्यान, दोघांना न्यायलयात हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि जयसिंग परदेशी, विश्र्वनाथ भिसे, पोहेकॉ हरीष राठोड, सॅम्युअल कांबळे, प्रंशात देशमुख, संजय मगरे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सागर बाविस्कर, रंजित वैराळ, सचिन चौधरी, हिरामण फलटणकर, विलास चेके, परमेश्वर धुमाळ, संदिप मांन्टे, लखनसिंग पचलोरे, विष्णु कोरडे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे यांनी केली.