Jalna Crime Video: गुन्हा दाखल केला आहे आता आरोपींना अटक करा, या मागणीसाठी एक कुटुंब जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताहेत. गेल्या महिनाभरापासून ते इथेच आहेत. पण, त्यांच्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहणासाठी आल्या होत्या. त्यांना भेटण्याचा उपोषणकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा ताफा अडवला. बस्स... त्यांच्या इतक्याच गोष्टी पोलीस उपअधिक्षकांना इतका राग आला की, त्यांनी उडी मारून उपोषणकर्त्यांच्या कमरेत लाथ मारली. त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याऐवजी मस्तवाल पोलीस अधिकाऱ्यांने त्यांना लाथ घातली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कारवाईची मागणी केली जात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पत्नीचे तिच्या कुटुंबीयांनी परस्पर लग्न लावले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे. ते महिनाभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत.
पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी पळत आले अन् लाथ घातली
पोलीस आरोपींना सहकार्य करत असून आम्हाला त्रास देत आहे, असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले आणि घेऊन जाऊ लागले. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पाठीमागून पळत येऊन लाथ मारली.
अधिकाऱ्यावर कारवाई करा; व्हिडीओ पाहून लोकांचा संताप
सोशल मीडियावर लोक पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान आमदार रोहित पवारांनीही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. "नागरिकाच्या कंबरेत पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा", अशी मागणी रोहित पवारांनीही केली आहे.