The Department of Water Conservation blossomed a paradise | जलसंधारण विभागाने फुलवले नंदनवन

जलसंधारण विभागाने फुलवले नंदनवन

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळावर मात करण्यासाठी जालना येथील मृद व जलसंधारण विभागाने कार्यालय परिसरात विविध जातीचे तब्बल ३७०० रोपे लावून नंदनवन फुलवले आहे. या नंदनवनामुळे एरव्ही ओसडा असलेला हा विभाग आता सर्वांनाच आकर्षित करीत आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झाडांचे प्रमाणही कमी होत असल्याने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे. परिणामी, दरवर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, पाण्याच्या शोधासाठी प्रत्येकाला वणवण भटकंती करावी लागत आहे, असे असताना जिल्ह्यात मात्र सर्रासपणे वृक्षतोड सुरु आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
एकीकडे प्रशासनाकडूनच कारवाई केली जात नाही तर दुसरीकडे प्रशासनाचेच अधिकारी वृक्ष लागवडीवर भर देत आहेत. सध्या जालना शहरातील शासकीय रूग्णालयाच्या रस्त्यावर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरवरसिंग सुसमणी यांच्या संकल्पनेतून कार्यालय परिसरातील ६६६ चौरस मीटरवर ‘मिया वाकी डेन्स फॉरेस्ट’ उभारण्यात आले आहे. यात विविध जातीच्या २१०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. तर अडीच हेक्टरवर १६०० रोपांची लागवड करून नंदनवन फुलविण्यात आले आहे.
पावसाळ््यात या झाडांची लागवड करण्यात आली. खडकाळ जमीन असल्यामुळे येथे मोतीबाग येथून ७० टिपर गाळ आणून टाकण्यात आला. त्यात ही झाडे लावण्यात आली आहे. यासाठी जलसंधारण अधिकारी सुसमणी व कार्यालयीन अधीक्षक के. एस. जावळे यांनी परिश्रम घेतले.
पाण्यासाठी हौद ; झाडांना ठिंबकचा आधार
लागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी १३ हजार लिटर साठवण समता असलेला हौद तयार करण्यात आला आहे. तसेच बोअर देखील घेण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, यासाठी सर्वच झाडांना ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. झाडांना मोकाट जनावरांनी खाऊ नये, यासाठी वाल कम्पाऊंड देखील करण्यात आले. झाडांच्या निगराणीसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आला आहे.
या जातींच्या रोपांची केली लागवड
या परिसरात पिंपळ, लिंबू, रबर ट्री, गुलमोहर, बांबू, शेवगा, फणस, सिरस, बदाम, जास्वंद, चमेली, सिसम, पपई, एकझोरा, आवळा, कांचन, बूच, शेवरी, सागरगोटा, रेन ट्री, ग्रीसडिया, आंबा, करंज, रूठी, गोरखचिंच, शेमल, बोर, अंजन इ. जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

Web Title: The Department of Water Conservation blossomed a paradise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.