जालना : गत वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अंध व्यक्तींनाही मोठी कसरत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला वारंवार लॉकडाऊन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वचजण हैराण आहेत. लॉकडाऊन काळात अंध व्यक्तींचे जगणे मुश्किल बनले आहे. जालना येथील संजय सूर्यवंशी हे शहरातील चमन परिसरात खेळण्यांचे साहित्य विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु, मागील दाेन महिन्यांपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे ते घरीच बसून आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पती, मुलगा असा परिवार आहे. ते नातेवाईकांकडून उसनवारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
जिल्ह्यात एकही अंध व्यक्ती पॉझिटिव्ह नाही. जालना जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ घालत आहे. दिवसागणिक दररोज ६०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. असे असतानाही जिल्ह्यात एकाही अंध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मदतीची मागणी
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने अंध व्यक्तींचे जगणे मुश्किल बनले आहे. शासनाने अंध व्यक्तींना मदत करावी, अशी मागणी अंध व्यकींकडून केली जात आहे.
कोरोनामुळे माझे कुटुंब अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे. कुटुंबात इतर कोणीही काम करत नाही. कोरोनाच्या अगोदर मंदिरांबाहेर फूल, हार विकण्याचे काम करीत होतो. परंतु, लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे हातचे काम गेले आहे. उसनवारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
- दत्ता मसुरे, अंबड
कोरोनामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. दिव्यांगांचे जगणे अवघड बनले आहे. दिव्यांग पानटपरी, चहाचे हॉटेल चालवून, गोळ्या बिस्किटे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. परंतु, सध्या लॉकडाऊनमुळे जगणेच अवघड बनले आहे. शासनाने दिव्यांगांना मदत करावी.
- अनिरुध्द म्हस्के, जालना
मी १०० टक्के डोळ्याने अंध आहे. कोरोनाच्या अगोदर लहान मुलांची खेळणी, गोळ्या, बिस्किटे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होतो. परंतु, आता कडक निर्बंध असल्याने घरीच बसावे लागत आहे. शासनाने आम्हाला मदत करावी.
- संजय सूर्यवंशी, नाहेगाव
कोरोनाच्या काळात अपंग व्यक्तींना जगणे अवघड बनले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे शासनाकडूनही मदत केली जात नाही. शासन शिधापत्रिका धारकांना रेशन देत आहे. परंतु, दिव्यांग व्यक्तींना धान्य दिले जात नाही. याकडे लक्ष द्यावे.
- विठ्ठल चव्हाण, जिल्हाध्यक्ष, जालना, प्रहार अपंग क्रांती संघटना जालना