"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:52 IST2025-11-12T18:51:44+5:302025-11-12T18:52:35+5:30
घातपाताचा सामूहिक कट रचला गेला आहे; मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणे खूप गरजेचे आहे: मनोज जरांगे

"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या संभाव्य घातपाताच्या कटाचे गांभीर्य आता राजकीय वर्तुळात वाढले आहे. ज्या कांचन साळवेचे नाव जरांगे पाटलांनी हत्येच्या कटात घेतले होते, त्याला जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर बोलताना जरांगे पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आणि धनंजय मुंडेंना चौकशीला आणण्याची मागणी करत एक अंतिम इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणाचे गांभीर्य वारंवार अधोरेखित केले आहे. जरांगे पाटील म्हणाले, "हे प्रकरण खूप मोठं आहे, हा लहान विषय नाही, चेष्टेवरती सहज घेण्याचा विषय नाहीये. सामूहिक कट रचला गेला आहे घातपाताचा! मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणे खूप गरजेचे आहे." जरांगे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक बन्सल यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
धनंजय मुंडेंना थेट आव्हान
जरांगे पाटलांनी हत्येच्या कटाचे आरोप असलेले धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिले. "धनंजय मुंडे यांना सुद्धा चौकशीला आणलं पाहिजे, कारण त्यानेच हे घडून आणलं आहे आणि मी खोटं बोलत नाही. नार्को टेस्ट करायची म्हटल्यावर कुठे गेला? आता नार्को टेस्टला निघायचं, शहाणपणा करायचा नाही. तू पाप करणार आणि गोरगरिबांना रस्त्यावर उतरोवणार का? नार्को टेस्ट करायला चल तिकडं!"
अजित पवारांना '२०२९' चा इशारा
धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याच्या भूमिकेवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट लक्ष्य केले. "दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं भाषण असतं, 'मी खोटं सहन करत नाही, मी कामाचा माणूस आहे.' तुम्ही कामाचे आहेत का नाही हे आता लक्षात येईल! ...2029 ला तुम्हाला इतकं महागात पाडील मी, पुन्हा बोलता सोय नाही!" सत्ता आणि पदाच्या जोरावर या कटावर पांघरूण घालू नका, नाहीतर मराठे शांत बसणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.