जालन्यात रक्ताचा सडा! तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; ४ राऊंड फायर केल्याने शहर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:18 IST2026-01-24T13:15:07+5:302026-01-24T13:18:29+5:30
दहशत की सूड? जालन्यात पुन्हा गुन्हेगारांचे डोके वर; गावठी कट्ट्यातून ४ राऊंड फायर

जालन्यात रक्ताचा सडा! तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; ४ राऊंड फायर केल्याने शहर हादरले
जालना: जालना शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या नूतन वसाहत परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास थरकाप उडवणारी घटना घडली. एका खासगी बालरुग्णालयासमोर अज्ञात हल्लेखोरांनी चरण रायमलू (वय २७) या तरुणाच्या डोक्यात गावठी पिस्तुलातून ३ ते ४ गोळ्या झाडून त्याची हत्या केली. भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमका घटनाक्रम काय? कैकाडी मोहल्ला येथील रहिवासी असलेला चरण रायमलू शुक्रवारी रात्री आपल्या दुचाकीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडील रस्त्याने जात होता. तो एका बालरुग्णालयासमोर पोहोचला असता, दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरांनी त्याला अडवले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी पिस्तूल काढून चरणच्या डोक्यावर रोखले आणि एकामागून एक ३ ते ४ गोळ्या झाडल्या. गोळ्या थेट डोक्यात घुसल्याने चरण रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.
पोलिसांची धाव अन् तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तातडीने चरणला खासगी रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, तपासासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
शवविच्छेदनासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरला
मृत चरणच्या डोक्यात गोळ्या अडकलेल्या असल्याने 'इन कॅमेरा' शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी जुन्या वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.