मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:23 IST2025-08-27T11:21:09+5:302025-08-27T11:23:10+5:30
मुंबईकडे रवाना झालेल्या आंदोलकांवर पोलिसांच्या ड्रोनची नजर, सुरक्षेसाठी 450 पोलीस तैनात

मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
वडीगोद्री (जालना) : मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या निर्णयक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालनापोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीसा दिल्या आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या ताफ्याला जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत अटीशर्तीसह परवानगी दिली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 प्रमाणे नोटीसा बजावण्यात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
एकूण ४० अटीशर्तीमध्ये वाहतूक नियम पाळण्यासह शांततेत मोर्चा करण्याच्या सूचना आहेत. मोर्चामध्ये आक्षेपार्ह घोषणा होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घेण्याच्या सूचना. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन न करण्याच्या सूचना,वाहतूक मार्गाचे पालन करण्याच्या देखील सूचना न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
मोर्चावर पोलिसांच्या ड्रोनची नजर; बॉम्ब शोधक पथक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांची तयारी देखील पूर्ण झाली असून जवळपास 450 कर्मचारी अधिकारी मनोज जरांगे यांच्या मोर्चासाठी बंदोबस्तात तैनात असणार आहे.दोन एसआरपीएफच्या कंपन्यासह बॉम्ब शोधक पथक देखील असणार आहे तर मनोज जारंगे पाटील यांच्या मोर्चावर पोलिसांच्या ड्रोनची नजर असणार आहे. दरम्यान मराठा आंदोलकांना पोलिसांनी शांततेच आवाहन केलं आहे.
मध्यरात्री मराठा आंदोलक अंतरवालीत दाखल
मनोज जरांगे पाटील आज १० वाजता मुंबईकडे रवाना होणार असून मंगळवारी मध्यरात्री मराठवाड्यातून मराठा बांधव आंतरवालीत दाखल झाले आहे. ट्रॅक, टेम्पोमध्ये आपले सर्व साहित्य घेऊन मराठा बांधव आले असून काही वेळाने ते आता मुंबईकडे रवाना होणार आहेत.
अशा आहेत अटीशर्ती :
- प्रवासासाठी कोणत्या ठिकाणाहून किती लोक येणार आहेत याबाबत जिल्हा / तालुका/ गाव निहाय माहिती
- पोलीस विभागास कळविण्यात यावी, त्याबाबत आपल्याकडेही माहीती ठेवावी.
- सदर प्रवासामध्ये आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
- सदर प्रवासाचा मार्ग हा घोषीत केल्या प्रमाणेच राहील व नंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने जसे अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड इत्यादी तसेच इतर वाहने आणि वाहतुक / रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- आपण ज्याठिकाणी थांबणार आहात त्याठिकाणी अस्वच्छता व रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
- तसेच रस्त्यामध्ये कोणीही कचरा टाकणार नाही आणि घाण पसरवणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ज्याठिकाणी थांबणार आहात त्याठिकाणी पुरेशी प्रसाधनगृह व शौचालय याची व्यवस्था करावी.
- सदर प्रवासामध्ये तांत्रिक दृष्ट्या योग्य व सुरक्षित असलेली वाहनेच प्रवासासाठी येणाऱ्या लोकांनी आणावीत, जेणे करुन कोणतीही अप्रिय घटना/अपघात होणार नाही.
- सदर प्रवासामध्ये विनापासिंग, फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश हॉर्न सायलेन्सर असलेले मोटार सायकल व इतर वाहने सामिल होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
- सदर प्रवासामध्ये एक मोटार सायकलवर 02 पेक्षा जास्त नागरिक असणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याच प्रमाणे इतर वाहनांवर सुध्दा क्षमतेपेक्षा व नियमानुसार प्रवासी बसतील याची दक्षता घ्यावी.
- सदर प्रवासादरम्यान कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सदर प्रवासामध्ये मोठ-मोठ्याने हॉर्न, सायलेन्सर वाजविण्यात येऊ नये.
- सदर प्रवासामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना रस्त्याचे एका कडेने चालण्याच्या सूचना द्याव्यात जेणे करुन वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही. तसेच स्वतःची व इतरांच्या सुरक्षीततेची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात याव्यात.
- मुंबईकडे वाहनांनी आंदोलक निघाल्यास वाहनांची व लोकांची गर्दी होऊन त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी
- सदर प्रवासा दरम्यान खाजगी / सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई करण्याची जबाबदारी आयोजक आंदोलन कर्त्याची राहील. अशा एकूण ४० अटी शर्ती परवानगी देण्यात आली आहे.