'बीडचा ओबीसींचा मोर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत'! मनोज जरांगेंचा थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:12 IST2025-10-16T19:10:36+5:302025-10-16T19:12:39+5:30
'मी चौथी पास, पण तुम्हाला पुरून उरेन!' मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना थेट इशारा; बीडच्या मोर्चावर मोठा गौप्यस्फोट

'बीडचा ओबीसींचा मोर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत'! मनोज जरांगेंचा थेट निशाणा
- पवन पवार
वडीगोद्री (जालना):मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे उद्या होणाऱ्या ओबीसी समाजाच्या मोर्चावर सडकून टीका केली आहे. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी पुरस्कृत केलेला दिसत असून, आरक्षणाला विरोध करणारे ओबीसी नेते केवळ 'राजकीय पोळी' भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असे परखड मत जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
'दुधखुळे नाही, फडणवीसांचाही कंट्रोल असू शकतो'
ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जरांगे म्हणाले, "जीआर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढला आहे, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री त्याला विरोध करत आहेत. याचा अर्थ आम्हाला कळणार नाही, एवढे आम्ही दुधखुळे नाही. यावर फडणवीस साहेबांचाही कंट्रोल असू शकतो."
'मी चौथी पास, पण सगळ्यांना पुरून उरेन'
जरांगे यांनी विरोधकांना थेट आव्हान देत म्हटले, "तुम्हाला वाटते मी चौथी पास आहे, पण मी सगळ्यांना पुरून उरेल एवढी ताकद माझ्यात आहे." ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जातीला लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, पण मराठा समाज कधीही दुसऱ्यांच्या लेकरांना विरोध करत नाही. "मराठ्यांनी ठरवलं तर बीडमध्ये काय, राज्यभरात पाऊल ठेवून देणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांसाठी आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना जबाबदार धरले होते. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले. "यांना कोणी मेलं काय, यांना देणं-घेणं नाही. ही यांची राजकीय पोळी कशी भाजेल हे बघतात. यांनी ओबीसीचे आरक्षण घेऊन ओबीसींचे वाटोळं केलेले आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला धक्का लागत नाही हे मान्य करून मोर्चे काढणे बंद करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
'माथेसुल उठला' म्हणत वडेट्टीवारांवर टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, "वडेट्टीवारला माथेसुल उठला आहे. पहिले म्हणत होता मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. आता मोर्चा काढल्यामुळे तो उघडा पडला आहे." ते पुढे म्हणाले की, "त्याने पूर्ण काँग्रेस संपवली आहे. त्याला काही कळत नाही. राहुल गांधींनी याची कानउघडणी करायला पाहिजे होती."
जीआर रद्द करणे एवढे सोपे नाही!
ओबीसी नेते 'कुणबी' जीआरला विरोध करत असल्याने जरांगे यांनी त्यांना थेट आव्हान दिले. "जीआर रद्द होत नसतो, एवढं सोपं आहे का? हात लावा मग सांगतो तुम्हाला," असा इशारा जरांगे यांनी दिला. तसेच, हे आरक्षण सरसकट नसून, केवळ मराठवाड्यातील मराठा समाजासाठी आहे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.