मोसंबीला फाटा, पेरूला साथ! १२ महिन्यांत लाखोंचं उत्पन्न देणाऱ्या पेरू शेतीकडे बळीराजाचा कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:42 IST2026-02-05T12:41:51+5:302026-02-05T12:42:26+5:30
जालन्याच्या दुष्काळी मातीत शेतकऱ्यांचा नवा 'सक्सेस मंत्र'

मोसंबीला फाटा, पेरूला साथ! १२ महिन्यांत लाखोंचं उत्पन्न देणाऱ्या पेरू शेतीकडे बळीराजाचा कल
हस्तपोखरी (जि. जालना) : अंबड तालुक्यातील हस्तपोखरी आणि परिसरात सध्या शेतीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पारंपरिक मोसंबी बागांवर जेसीबी फिरवून शेतकरी आता पेरू लागवडीकडे वळले आहेत. बदलत्या हवामानाचा फटका आणि मोसंबीला मिळणारा अल्प भाव यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पेरूच्या रूपाने नवा पर्याय निवडला आहे.
गेल्या २-३ वर्षांपासून मोसंबी बागेतून मिळणारे उत्पन्न घटले आहे. बाजारातील दराची अनिश्चितता आणि वातावरणातील बदलांमुळे फळबागांवर येणारे विविध रोग यामुळे मोसंबी बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. खर्च जास्त आणि नफा कमी, अशा परिस्थितीमुळे अखेर अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पेरूच्या आधुनिक वाणांमुळे लागवडीनंतर अवघ्या १२ महिन्यांत खात्रीशीर उत्पन्न सुरू होते.
पाण्याचे काटकसरीने नियोजन
मोसंबीच्या तुलनेत पेरूच्या झाडांना कमी पाणी लागते. उन्हाळ्यात झाडांची छाटणी केल्यावर पाण्याची उपलब्धता नसली तरी झाडे तग धरतात.
थेट विक्रीची सोय
पेरूचा बहर येताच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांतील व्यापारी थेट बांधावर येऊन सौदा करतात. यासंदर्भात प्रगतिशील शेतकरी दिनेश वाघ यांनी सांगितले की, "माझ्याकडे दोन हजार झाडांची मोसंबी बाग आहे; परंतु त्यातून अपेक्षित नफा मिळत नव्हता. त्यामुळे मी आता २५ एकर क्षेत्रावर नवीन पेरूच्या वाणांची लागवड करत आहे. पेरू शेती ही सध्याच्या काळात अधिक परवडणारी आणि शाश्वत आहे, असेही त्यांनी सांगितले.
१०० एकरवर लागवड
हस्तपोखरी परिसरात जवळपास १०० एकर क्षेत्रावर पेरूची नवीन लागवड सुरू आहे. प्रामुख्याने मृग बहराचे नियोजन करून शेतकरी भरघोस उत्पन्नाची आशा धरून आहेत. या बदलामुळे परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.