Assistance of Rs. 110 crores to Jalna farmers | जालन्यातील शेतकऱ्यांना ११० कोटींची मदत
जालन्यातील शेतकऱ्यांना ११० कोटींची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसासाठी प्रतीक्षा करावी लागली. जेमतेम पावसात शेतकऱ्यांनी खरिपाची पिके तगवली. आता केवळ सांगनी करून सोयाबीन बाजारात नेणे तेवढे शिल्लक असताना, परतीच्या पावसाने त्याची दाणादास उडवून दिली. यात सर्वात जास्त फटका सोयाबीन आणि मका पिकाला बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन चार लाख ८० हेक्टरवरील नुकसान झाले होते. यानुसार शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.
जिल्ह्यात पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात मुबलक पाऊस पडला. परंतु अन्य तालुक्यात पावसासाठी शेतकºयांच डोळे आभाळाकडे लागून होते. परंतु पावसाळा संपल्यावरही या सहा तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झाला नव्हता. परंतु नंतर आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ही पावसाची तूट भरून काढली. तूट भरून काढतांना हातातोंडाशी आलेल्या पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी ठरला. यामुळे शेतक-यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते.
हे झालेले नुकसान भरून निघत नसल्याने शेतक-यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे केले. यावेळी कृषी विभाग तसेच महसूल आणि ग्रामसेवकांनी या महत्त्वाची भूमिका निभावली. जिल्ह्यातील पंचनामे केल्यावर जे नुकसान झाले आहे, त्यापोटी राज्य सरकारने जुन्या निकषानुसारच ही मदत देऊ केली आहे. राज्यात सरकार नसतांना राज्यपालांनी ही मदत जाहीर केली आहे. आता ही ११० कोटींची मदत जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यात आता ज्या तालुक्यात जास्त क्षेत्राचे नुकसान झाले, त्यानुसार त्यांचे वाटप तालुकानिहाय होऊन नंतर ते अनुदान तहसील पातळीवरून शेतक-यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.
राज्यात परतीच्या पावसाने जेनुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यासाठी १३ मे २०१५ चा अध्यादेश ग्राह्य धरला आहे. त्यानुसार कोरडवाहू शेतक-यांना प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रूपये तर, बागयायती शेतक-यांच्या नुकसानीपोटी आठ हजार रूपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Assistance of Rs. 110 crores to Jalna farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.