मोर्चा जवळ आला की, मनोज जरांगे यांचा दवाखाना पुढे येईल; गुणवर्त सदावर्ते यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:00 IST2025-05-17T16:57:04+5:302025-05-17T17:00:01+5:30
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे २९ मे रोजी जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

मोर्चा जवळ आला की, मनोज जरांगे यांचा दवाखाना पुढे येईल; गुणवर्त सदावर्ते यांची टीका
जालना : मनोज जरांगे यांनी मुंबई येथे माेर्चा काढण्याचे सांगितले आहे. परंतु, मोर्चा जवळ आला की, त्यांचा दवाखाना पुढे येईल, अशी टीका गुणवर्त सदावर्ते यांनी केली. जालना येथे झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी ते पोलिस अधीक्षक कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे २९ मे रोजी जाणार असल्याचे जाहीर केले आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे हे कुण्यातरी पक्षाचे हस्तक आहेत. यामुळे निवडणुका आल्या की, मनोज जरांगे यांची चुळबुळ सुरू होते. ते काही मोर्चा काढू शकणार नाहीत, अशी टीका सदावर्ते यांनी केली. मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा बांधवांचे नुकसान झालेले आहे. ईडब्लूएसच्या आरक्षणामधील मराठा उमेदवारांचे प्रमाण कमी झालेले आहे. यामुळे मनोज जरांगे यांना वैचारिकदृष्ट्या समाज फार काळ काही समाज स्वीकारणार नाही, असे सदावर्ते म्हणाले. सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण निवडणुकीपूर्वी मागे घ्यावे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.