काँग्रेसला आणखी एक झटका; प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्यालांचा लवकरच भाजप प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:45 IST2025-07-28T13:43:40+5:302025-07-28T13:45:25+5:30

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल यांनीही विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी विरोधात केलेले काम, पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित न मिळालेली साथ यावर उघड नाराजी व्यक्त केली होती.

Another blow to Congress; State Vice President Kailash Gorantyal to join BJP soon! | काँग्रेसला आणखी एक झटका; प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्यालांचा लवकरच भाजप प्रवेश!

काँग्रेसला आणखी एक झटका; प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्यालांचा लवकरच भाजप प्रवेश!

जालना : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असून, पक्षप्रवेशासाठी बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. याबाबत गोरंट्याल यांनी दुजोरा दिला असून लवकरच पक्ष प्रवेश होईल अशी माहिती दिली. गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश सुरेशकुमार जेथलिया यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेस पक्षाला दुसरा मोठा झटका राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात उडी घेतली. जेथलिया यांनी पक्ष सोडल्यानंतर परतूर- मंठ्यात काँग्रेसला मोठा झटका बसला होता. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल यांनीही विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी विरोधात केलेले काम, पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित न मिळालेली साथ यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. गत काही दिवसांपासून गोरंट्याल हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही होत्या. मात्र, गोरंट्याल यांच्याकडून दुजोरा देण्यात आला नव्हता. परंतु, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. यापूर्वी नगरपालिकेवर काँग्रेसचे अर्थात गोरंट्याल यांच्या गटाचे वर्चस्व होते. महापालिकेची निवडणूकही होणार आहे. अशा स्थितीत गोरंट्याल हे भाजपात प्रवेश करणार असून, त्यासाठी ते भाजपातील बड्या नेत्यांच्याही संपर्कात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश व्हावा असा गोरंट्याल यांचा आग्रह असल्याची माहिती आहे. 

लवकरच राजकीय बॉम्ब
यापूर्वी आपण लवकरच राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचे गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. खा. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातही लवकरच राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा पुनरुच्चार केला होता.

भोकरदनमध्ये झाली बैठक
काही दिवसांपूर्वी गोरंट्याल यांनी भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट घेतली. त्या बैठकीत भाजप प्रवेशावर चर्चा झाल्याचे समजते. त्याशिवाय अशोक चव्हाण, अतुल सावे, नारायण कुचे यांच्या मार्फतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्यासाठी गोरंट्याल प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

जालना महापालिका 'टार्गेट'
नव्याने तयार झालेल्या जालना महापालिकेची पहिलीच निवडणूक होणार आहे. महापालिकेवर आपलीच सत्ता यावी यासाठी आमदार अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे, कैलास गाेरंट्याल यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यात गोरंट्याल हे भाजपात गेले तर भाजपची ताकद वाढणार असून, अंतर्गत राजकीय विरोध असणाऱ्या शिवसेनेला शह देता येणार असल्याची चर्चाही भाजपच्या गोटात आहे.

लवकरच भाजप प्रवेश
खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने भाजप प्रवेश. उद्या प्रवेशासाठी निमंत्रण होते. पण यावेळी माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचा देखील भाजप प्रवेश होत असल्याने त्यांचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते असा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे प्रवेश पुढच्या काही दिवसांत होईल.
- माजी आमदार कैलास गोरंट्याल

Web Title: Another blow to Congress; State Vice President Kailash Gorantyal to join BJP soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.