जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:07 IST2019-04-29T17:07:01+5:302019-04-29T17:07:50+5:30
प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा होत असल्याचा आरोप

जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
जालना : शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन तीन महिने झाले आहे. असे असतांनाही प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २९ ) शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरासह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.
जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागवून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगून प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा केला होतो. आता निवडणूक होवून आठवडा झाला आहे.
मात्र प्रशासनाकडून जनावरांचा चारा, टँकरची व्यवस्था अद्यापही केलेली नाही. ग्रामसेवक, मंडळअधिकारी मुख्यालयी थांबतच नसल्याने कोणाकडे दाद मागावी अशी स्थिती जिल्ह्यात झाली आहे. प्रशासनाला निवेदन देऊनही या गंभीर बाबीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने संतप्त शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रखरखत्या उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालसमोर जनावरासह आंदोलन केले. जिल्ह्यात मागणी तेथे चारा छावण्या सुरु करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली.निवेदनावर आप्पासाहेब कदम, दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, डॉ. भागवत काळे, अशोक आटोळे, कृष्णा पिसोरे, शिवाजी तुपे, अंकुश लकडे, मनोहर गात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.