वाळूमुळे पाच जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग, विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:42 IST2025-02-24T15:41:11+5:302025-02-24T15:42:14+5:30
विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांशी केली तहसील कार्यालयात बंद दाराआड चर्चा; वाळू तस्करांना आवरणार कोण?

वाळूमुळे पाच जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग, विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
- प्रकाश मिरगे
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात भारज - पासोडी रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा अवैध पुरवठा करणाऱ्या वाहनामुळे पाच मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना शनिवारी घडली. या अवैध वाळू तस्करीला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, रविवारी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाफराबाद तहसील कार्यालयात महसूल व पाेलिस अधिकाऱ्यांसोबत दुपारी बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान, टिप्पर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी महसूल, पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने वाळूचा धंदा जोरात सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून, ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल, पोलिस यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागासाठी वाळू आवश्यकच आहे. वाळूचे दरही नियंत्रणात राहणे घरांसाठी आवश्यक, तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये. अशी कसरत सुरू असतानाच वाळू तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संकटाला राजकीय पाठबळसुद्धा जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रविवारी जाफराबाद येथे विभागीय आयुक्तांनी बंद दाराआड बैठक घेऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी डावरगाव देवी येथील वाळूघाटाची पाहणी केली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार डॉ. सारिका भगत, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
चोरून वाळूची वाहतूक करणारा टिप्पर चालक संतोष शेषराव कोल्हे (रा. जाफराबाद) व टिप्पर मालक गोपाल गवळी (रा. खापरखेडा) यांना जाफराबाद पोलिसांनी अटक केली आहे. टिप्पर चालक संतोष कोल्हेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, संतोष कोल्हे याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर टिप्पर मालक गोपाल गवळी यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.