जालन्याचा युवा वारकरी नीरा नदीत बुडाला; विठ्ठला, माझ्या गोविंदाला सुखरूप ठेव...आईचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:06 IST2025-07-02T14:06:22+5:302025-07-02T14:06:55+5:30
ग्रामस्थ आई-वडिलांना धीर देतानाच घराच्या दारावर असलेल्या विठ्ठलाचा फोटो पाहून गोविंद सुखरूप राहावा, यासाठी प्रार्थना करीत होते.

जालन्याचा युवा वारकरी नीरा नदीत बुडाला; विठ्ठला, माझ्या गोविंदाला सुखरूप ठेव...आईचा टाहो
सराटी/अंबड (जि. पुणे/ जालना) : अंघोळीसाठी नीरा नदीत उतरलेला जालन्यातील युवा वारकरी मंगळवारी सकाळी पाण्यात वाहून गेला. एनडीआरएफच्या पथकाकडून दिवसभर या युवकाचा शोध सुरू होता. ही घटना इंदापूर तालुक्यातील सराटी गावाच्या नीरा नदीच्या किनारी मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली. गोविंद कल्याण फोके (वय २०, रा. झिरपी, ता. अंबड. जि. जालना) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. या दिंडीत तो आजीसोबत गेला होता.
मंगळवारी सकाळी नीरा नदीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानाची तयारी नदीच्या सराटी गावाकडच्या दिशेने सुरू होती. अकलूजकडे जाणाऱ्या दिशेने गोविंद हा स्नानासाठी नीरा नदीत उतरला होता. त्याचवेळी तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, पंढरीच्या वारीसाठी निघालेला गोविंद ऊर्फ आकाश कल्याण फोके (वय १९, रा. झिरपी, ता. अंबड) हा हरवल्याची माहिती मंगळवारी सकाळी मिळताच त्याचे आई-वडील चिंतीत झाले होते. 'विठ्ठला माझ्या गोविंदाला सुखरूप ठेव..' असा धावा हंबरडा फोडत आई करीत होती.
घुंगर्डे हदगाव येथील हभप विष्णू महाराज मस्के यांच्या दिंडीत १८ जूनपासून गोविंद फोके (रा. झिरपी) व त्याची आजी प्रयागबाई खराबे (रा. एकलहरा) हे सहभागी झाले होते. सदरील दिंडी ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीमधील १२ नंबरची दिंडी आहे. प्रयागबाई खराबे गतवर्षीपासून दिंडीत जात होत्या. गोविंद यंदा प्रथमच दिंडीत सहभागी झाला होता. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा स्नान सोहळा माळशिरस तालुक्यातील सराटी गावातील नीरा नदीत सुरू असताना आकाशदेखील नदीत गेला होता. परंतु, तो पाण्याच्या प्रवाहात बुडाला. गोविंद पाण्यात वाहून गेल्यानंतर नातेवाइकांनी आई नम्रता फोके आणि वडील कल्याण फोके यांना मुलगा दिंडीत हरवल्याची माहिती दिली. मुलगा हरवल्याचे समजताच आई-वडिलांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमा झाले. आईने तर एकच हंबरडा फोडला. दिवसभर नातेवाईकही त्यांची भेट घेऊन धीर देत होते.
एकुलता एक मुलगा
गोविंद फोके हा एकुलता एक मुलगा असून, त्याच्या बहिणीचे लग्न झालेले आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून, तो अंबड येथील एका दुकानात काम करतो. मोलमजुरी, शेतीतून फोके कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.
राजेश टोपे घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आजी प्रयागबाई खराबे यांना धीर दिला. तसेच आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी संवाद साधून शोधकार्याबाबत सूचना दिल्या.
आजोळीही चिंतेचे वातावरण
गोविंद हा नदीपात्रात बुडाल्याची माहिती मिळताच त्याचे मामा व इतर नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना झाले. तर एकलहरा येथील आजोळी आजोबा प्रभाकर खराबे व त्याची मामी असून, त्याच्या आजोळीही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
घराच्या दारावर विठ्ठलाचा फोटो
कल्याण फोके यांच्या घराच्या दारावर मोठा विठ्ठलाचा फोटो आहे. गोविंद पाण्यात बुडाल्याचे समजताच चिंतीत झालेले नातेवाईक आणि गावकरी फोके यांच्या घराकडे जात होते. त्याच्या आई-वडिलांना धीर देतानाच घराच्या दारावर असलेल्या विठ्ठलाचा फोटो पाहून गोविंद सुखरूप राहावा, यासाठी प्रार्थना करीत होते.