भक्ती आणि माणुसकीचा प्रत्यय! वडीगोद्रीत वानराच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांकडून विधिवत अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:11 IST2026-01-13T16:11:16+5:302026-01-13T16:11:46+5:30
भजन, कीर्तन आणि आरती झाल्यानंतर वानराच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून मारुती मंदिराच्या बाजूलाच दफन करण्यात आले.

भक्ती आणि माणुसकीचा प्रत्यय! वडीगोद्रीत वानराच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांकडून विधिवत अंत्यसंस्कार
- पवन पवार
वडीगोद्री (जि. जालना): अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे एका वानराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी दाखवलेली माणुसकी आणि श्रद्धा आज चर्चेचा विषय ठरली आहे. मारुती मंदिरासमोर प्राण गमावलेल्या या वानराचा गावकऱ्यांनी एखाद्या कुटुंबीयाप्रमाणे टाळ-मृदंगाच्या गजरात विधिवत अंत्यसंस्कार करून निरोप दिला.
नेमकी घटना काय?
मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वडीगोद्री येथील मारुती मंदिरासमोर वानरांच्या उड्या मारणे सुरू असताना, एका वानराचा विद्युत रोहित्राला (डीपी) स्पर्श झाला. विजेचा जोरात धक्का बसल्याने हे वानर जागीच ठार झाले. ही माहिती मिळताच मारुती मंदिराच्या परिसरात भक्तांची आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली.
भक्तीमय वातावरणात निरोप
हिंदू धर्मात वानराला 'बजरंगबली'चा अवतार मानले जाते. याच भावनेतून ग्रामस्थांनी वानराचा अंत्यविधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाचा गजर करण्यात आला. भजन, कीर्तन आणि आरती झाल्यानंतर वानराच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून मारुती मंदिराच्या बाजूलाच दफन करण्यात आले. यावेळी अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते. केवळ अंत्यसंस्कारच नव्हे, तर या वानराचा 'तेरावा' विधीही गावकरी सामूहिकपणे करणार आहेत. या घटनेमुळे वडीगोद्रीमध्ये भक्ती आणि माणुसकीचा एक आगळावेगळा आदर्श पाहायला मिळाला.