स्तुत्य निर्णय! १ कोटींचे राहते घर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, मुलींच्या हॉस्टेलसाठी दान
By विजय पाटील | Updated: July 25, 2023 19:39 IST2023-07-25T19:38:07+5:302023-07-25T19:39:54+5:30
वृद्ध दाम्पत्याचा स्तुत्य निर्णय; या कामासाठी ट्रस्ट स्थापन करणार पण अध्यक्षपद स्वीकारणार नाही

स्तुत्य निर्णय! १ कोटींचे राहते घर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, मुलींच्या हॉस्टेलसाठी दान
- विजय मुंडे
जालना : बांधकाम विभागातील सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता एस.एन. कुलकर्णी (८१) व त्यांच्या पत्नी रजनी कुलकर्णी (७७) या दाम्पत्याने जालना शहरातील भाग्यनगर भागातील २८०० स्क्वेअरफुटावरील राहते घर, स्वातंत्र्यवीर सावरकर भवन व मुलींच्या वसतिगृहासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
जालना शहरातील भाग्यनगर भागातील निवासस्थानी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत कुलकर्णी बोलत होते. सेवानिवृत्तीनंतर एस.एन. कुलकर्णी यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले होते. जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमिचे झालेले सुशोभिकरण असो किंवा तीर्थक्षेत्र राजूर येथील मंदिराचे बांधकाम असो या कामात त्यांनी मोठा हातभार लावलेला आहे. कुलकर्णी दाम्पत्यास दोन मुले, एक मुलगी आहे. स्वत:च्या संपत्तीतील आवश्यक तो हिस्सा मुलांना दिल्याचे कुलकर्णी म्हणाले.
आजवर अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी आपण प्रेरित झालो आहोत. त्यामुळे आपल्या राहत्या घराच्या जागेवर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन उभे रहावे, असा आपला मानस आहे. त्यामुळे आपले २८०० स्क्वेअरफुटावरील राहते घर आपण सावरकर भवन आणि मुलींच्या वसतिगृहासाठी दान करण्याचा निर्णय आम्ही दाम्पत्यांनी घेतला आहे. बाजारभावानुसार जागेची किंमत एक कोटी रूपयांच्या पुढे आहे. परंतु, या जागेवर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन आणि मुलींचे वसतिगृह उभे रहावे, असे आपले स्वप्न असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.
आलो इथे रिकामा बहरून जात आहे..
स्वातंत्र्यवीर सावरकर भवन व मुलींचे वसतिगृह तयार करण्यासाठी २५ जणांचे ट्रस्ट उभा केले जाणार आहे. ट्रस्टचे अध्यक्षपद आपण भूषविणार नाही. ट्रस्टचे अध्यक्ष आणि सदस्य नियुक्त झाल्यानंतर एकाच वर्षातच इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे, असा आपला मानस आहे. 'आलो इथे रिकामा बहरून जात आहे', या उक्तीप्रमाणे याची देही, 'याची डोळा हे काम व्हावे', यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही एस.एन. कुलकर्णी यांनी सांगितले.