‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:03 IST2025-09-19T12:58:29+5:302025-09-19T13:03:55+5:30

हैदराबाद गॅझेट निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्याच्या भुजबळांच्या आवाहनावर बोलताना जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली.

'A big political plot is being cooked to isolate me'; Manoj Jarange's sensational claim | ‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा

‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा

- पवन पवार 
वडीगोद्री (जालना):
मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या राजकारणावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ आणि मराठा गोलमेज परिषदेवर निशाणा साधताना ते म्हणाले की, “आमच्या काही लोकांच्या आणि ओबीसीतील काही जणांच्या माध्यमातून आम्हाला एकटे पाडण्याचा, गैरसमज पसरवण्याचा आणि राजकीय डाव रचण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

हैदराबाद गॅझेट निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्याच्या भुजबळांच्या आवाहनावर बोलताना जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “त्याचं जाऊ द्या तिकडं. तो येवल्यावाला नासका माणूस आहे, त्याला कोणाचं कल्याण व्हावं असं कधीच वाटलं नाही.” भुजबळांना उद्देशून ते पुढे म्हणाले, “ हा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दंगली लावून मोकळा होईल.” अंतरावली सराटीतील लाठीचार्जबाबत भुजबळांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना जरांगे म्हणाले, “तो जनताविरोधी, ओबीसीविरोधी आणि मराठाविरोधी आहे. सरकारने चौकशी केली, त्याला काय माहिती आहे? त्याचे आता आत जायचे दिवस जवळ आले आहेत.”

'गरीब मराठा आणि ओबीसीने संयम धरावा'
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी गरीब मराठा आणि गरीब ओबीसी समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "तुमच्यावर जर हल्ला झाला, तर मराठ्यांनी असंच म्हणायचं का? आम्ही कधी कोणत्याही जातीच्या आई-बहिणीबद्दल बोलत नाही, आम्ही सहानुभूती ठेवतो. असली पैदास जन्मालाच येऊ नये. त्याचे आई-बाबा जिवंत असतील तर थुकत असतील आणि नसतील तर नक्कीच शाप देत असतील."

‘धनगर समाजाच्या नेत्यांनी बुद्धीचा वापर करावा’
नाव न घेता लक्ष्मण हाके यांच्यावरही जरांगे पाटलांनी टीका केली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर ते म्हणाले, “मी बघण्यापेक्षा त्यांच्या नेत्याला कळायला पाहिजे. तुम्ही स्वतःला ज्ञानी, अभ्यासक समजता, पण हीच ताकद जर तुम्ही एसटी आरक्षणासाठी लावली असती, तर आतापर्यंत तुम्हाला आरक्षण मिळाले असते. तिकडे (एसटी आरक्षणासाठी) दोन महिने धावले असते, तर आतापर्यंत धनगर समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले असते.”

'गोलमेज परिषदेवर बोलायचं नाही'
काल झालेल्या गोलमेज परिषदेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही बाबा, आपलं गरिबांचं काम चालू आहे. ते आता अवघड आहे.” या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी थेट चर्चेला नकार दिला आहे.

Web Title: 'A big political plot is being cooked to isolate me'; Manoj Jarange's sensational claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.