पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:58 IST2026-01-07T11:56:11+5:302026-01-07T11:58:28+5:30
Russia Venezuela Deployment, US Russia War : रशियाने आपली युद्धनौका आणि पाणबुड्या व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर तैनात केल्या आहेत. निकोलस मादुरोच्या अटकेनंतर रशिया आणि अमेरिका थेट युद्धाच्या उंबरठ्यावर. वाचा सविस्तर.

पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?
जगावर महायुद्धाचे सावट गडद होताना दिसत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाने आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असलेली युद्धनौका आणि अण्वस्त्रवाहू पाणबुड्या थेट व्हेनेझुएलाच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. यामुळे अमेरिकेच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर रशिया आणि अमेरिका यांच्यात थेट लष्करी संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मादुरो यांना फोनवरून अमेरिकेने काही आगळीक केली तर मदतीला धावून येणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते आता रशिया पाळताना दिसत आहे. रशियाने आपल्या नॉर्दर्न फ्लीटमधील सर्वात शक्तीशाली युद्धनौका आणि पाणबुड्या कॅरिबियन समुद्रात धाडल्या आहेत. यामध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या युद्धनौकांचा समावेश आहे.
अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर ताबा मिळवण्याच्या आणि मादुरो यांना सत्तेवरून हटवण्याच्या केलेल्या कारवाईचा हा थेट निषेध असल्याचे रशियाने म्हटले आहे. "आम्ही आमच्या मित्रराष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कार्यालयाने दिला आहे.
अमेरिकेची धाकधूक वाढली
रशियाच्या या हालचालींमुळे पेंटागॉन (अमेरिकन संरक्षण मंत्रालय) सतर्क झाले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीपासून रशियाच्या या युद्धनौका केवळ काही मैल अंतरावर आहेत. अमेरिकेनेही प्रत्युत्तर म्हणून आपली विमानवाहू जहाजे अटलांटिक महासागरात तैनात केली आहेत. व्हेनेझुएलातील तेल साठ्यावरून सुरू झालेला हा वाद आता जागतिक महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
शीतयुद्धाच्या आठवणी ताज्या
१९६२ मधील 'क्युबन मिसाईल क्रायसिस' नंतरची ही सर्वात मोठी लष्करी तणावाची स्थिती असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियाने आपल्या पाणबुड्यांच्या माध्यमातून अमेरिकेच्या मुख्य भूमीला लक्ष करण्याची क्षमता दाखवून दिल्याने संपूर्ण नाटो (NATO) देशांमध्ये खळबळ उडाल्याचे वृत्त आहे.