होर्मुजची सामुद्रधुनी उघडणार की नाही? इराणचे स्पष्ट उत्तर; ट्रम्प यांना दिला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:47 IST2026-03-23T08:46:15+5:302026-03-23T08:47:01+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर, इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी उघडणार की नाही? इराणचे स्पष्ट उत्तर; ट्रम्प यांना दिला थेट इशारा
मिडल ईस्टमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर, इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जर अमेरिकेने आमच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला केला, तर स्ट्रॅट ऑफ होर्मुज कायमची बंद करू," असा थेट इशारा इराणने दिला आहे.
ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टिमेटम
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत ताकीद दिली होती. ट्रम्प म्हणाले होते की, "जर इराणने पुढील ४८ तासांत कोणत्याही अटीशिवाय होर्मुजची सामुद्रधुनी जहाजांच्या वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या पॉवर प्लांट्सवर हल्ला करेल. या कारवाईची सुरुवात इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून केली जाईल."
इराणचा पलटवार: 'आमचे नुकसान झाले तर तुमचेही प्रकल्प सोडणार नाही'
ट्रम्प यांच्या या धमकीला इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकिर कालीबाफ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "जर तेहरानच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर या संपूर्ण प्रदेशातील अमेरिकन गुंतवणुकीचे प्रकल्प आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या योजनांना लक्ष्य केले जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, त्या देशांतील ऊर्जा आणि पाणीपुरवठा केंद्रे आता इराणच्या रडारवर असतील.
'होर्मुज' बंद राहिल्याने जागतिक बाजारात खळबळबळ
स्ट्रॅट ऑफ होर्मुज हा जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे, जिथून जागतिक तेल आणि वायूचा मोठा पुरवठा होतो. २८ फेब्रुवारीपासून इराणने हा मार्ग बंद केला आहे. इराणने आता ठामपणे सांगितले आहे की, जोपर्यंत त्यांचे उद्ध्वस्त केलेले पॉवर प्लांट्स पुन्हा उभे राहत नाहीत, तोपर्यंत हा मार्ग बंदच राहील. या निर्णयामुळे आधीच इंधनाचे दर कडाडले असून जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सत्र सुरूच
मिडल ईस्टमध्ये सध्या क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत आहे. २१ मार्च रोजी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानसह मध्य आणि दक्षिण इराणमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये होर्मुज सामुद्रधुनीजवळील भागांचाही समावेश आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती देशांच्या काही भागांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून इराणने आतापर्यंत ४०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र, इस्रायलच्या प्रगत संरक्षण यंत्रणेने यातील सुमारे ९२ टक्के क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे.