आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 01:30 IST2025-11-25T01:29:37+5:302025-11-25T01:30:18+5:30
...चर्चेनंतर अमेरिका आणि युक्रेनने संयुक्त निवेदन जारी करत, आपण एक "उत्तम शांतता योजनेचा" मसुदा तयार केला असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबद्दल अधिक तपशील देण्यात आलेला नाही.

आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या प्रस्तावित शांतता योजनेसंदर्भात अमेरिका, युक्रेन आणि युरोपीय देशांच्या उच्चाधिकाऱ्यांची बैठक झाली. ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या २८-कलमी शांतता योजनेत युक्रेनच्या हितांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप युरोपीय सहकाऱ्यांनी केला आहे. या २८ कलमी योजनेतील त्रुटी दूर करून एक सुधारित शांतता आराखडा तयार करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
चर्चेनंतर अमेरिका आणि युक्रेनने संयुक्त निवेदन जारी करत, आपण एक "उत्तम शांतता योजनेचा" मसुदा तयार केला असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबद्दल अधिक तपशील देण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे, या संभाव्य शांतता योजनेवरील चर्चेचा काय निकाल लागतो, याकडे लक्ष असल्याचे रशियाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या योजनेवर टीका -
युक्रेनच्या सहकाऱ्यांनी ट्रम्प यांची योजना 'रशियाच्या बाजूची' असल्याचे म्हणत, त्यावर टीका केली. या योजनेत युक्रेनने युद्धात गमावलेल्या डोनेस्क आणि लुहांस्क प्रांतांवरील दावा सोडणे, सैन्यबळ कमी करणे आणि नाटोमध्ये सामील होण्याची इच्छा सोडणे यांसारख्या अटींचा समावेश आहे. ट्रम्प यांनी, या अटी असलेला शांतता प्रस्ताव मान्य करण्यासाठी युक्रेनला २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट -
ट्रम्प यांनी युक्रेनवर टीका करत, अमेरिका शस्त्रास्त्रे देत असतानाही युक्रेन कृतज्ञ नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे तसेच युरोपीय युनियन, जी-७ आणि जी-२० देशांचे आभार मानले. झेलेन्स्की पुढे म्हणाले, ट्रम्प यांच्या अटी मान्य केल्यास युक्रेन जमीन आणि आपला स्वाभिमान दोन्ही गमावेल आणि मान्य न केल्यास अमेरिकेचे सहकार्य गमावेल. युक्रेनसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे.