अमेरिकेपुढे सरेंडर करणार नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:22 IST2025-06-19T14:19:15+5:302025-06-19T14:22:32+5:30
Iran Israel War: इस्रायल करत असलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करण्याची अमेरिकेने केलेली मागणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी धुडकावून लावली.

अमेरिकेपुढे सरेंडर करणार नाहीच!
दुबई : इस्रायल करत असलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करण्याची अमेरिकेने केलेली मागणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी धुडकावून लावली आहे. अमेरिकेने जर लष्करी हस्तक्षेप केला, तर त्या देशाची कधीही भरून येणार नाही इतकी प्रचंड हानी होईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड करून त्या व्हिडीओचे सरकारी प्रसारमाध्यमांतून प्रसारण करण्यात आले. खामेनी कुठे आहेत हे आम्हाला माहित आहे पण त्यांना सध्या ठार मारण्याचा आमचा विचार नाही असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्याला खामेनी यांनी प्रत्युत्तर दिले.
त्यांनी मंगळवारी सांगितले की, ट्रम्प यांची धमकी हास्यास्पद आहे. जे लोक इराण, त्या देशाचा इतिहास, तेथील जनता यांच्याबद्दल जाणतात ते कघीच धमकीची भाषा वापरणार नाहीत. इराणी जनता कधीही कोणाला शरण जात नाही. इस्रायलसोबतच्या संघर्षात अमेरिकेने हस्तक्षेप केला तर त्या देशाचे अपरिमित नुकसान होईल. इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यानंतर खामेनी इराणमध्ये नेमके कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती गोपनीय राखण्यात आली आहे. त्यांच्या जारी झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या मागे इराणचा राष्ट्रध्वज तसेच त्यांच्या आधीचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे छायाचित्र दिसते. दरम्यान, इराण आणि इस्रायलचे एकमेकांवर जोरदार हल्ले सुरूच आहेत. (वृत्तसंस्था)
अडकलेल्या भारतीयांसाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताने १७ जून रोजी उत्तर इराणमधून इराण आणि आर्मेनियामधील ११० विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. ते एका विशेष विमानाने भारतात येत आहेत. इराणमध्ये १,५०० विद्यार्थ्यांसह १० हजार भारतीय अडकले आहेत. तेहरानमध्ये अडकलेले कोलकात्याचे साहसी गिर्यारोहक फाल्गुनी डे तब्बल ५०० किमीचा धोकादायक रस्ता पार करत मंगळवारी इराणच्या अस्तारा सीमेवर पोहोचले आहेत.
भारतीयांवर हल्ले
इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर त्यांच्या वसतिगृहात झालेल्या हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भात इराणचे परराष्ट्र खाते तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. क्षेपणास्त्रे इराणने इस्रायलवर डागली असून, शेकडो ड्रोनच्या माध्यमातून हल्ले चढविले आहेत. त्यात २४ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला व शेकडो लोक जखमी झाले. रिव्होल्युशनरी गार्ड अकॅडमीवरही हल्ला करण्यात आला.
हल्ला करणार की नाही, हे फक्त मलाच माहिती: ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याबाबत बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी हल्ला करू शकतो अन् कदाचित नाहीही. मी काय करणार आहे हे कोणालाच माहिती नाही. इराण खूप अडचणीत आहे. ते आता चर्चा करण्यासाठी तयार आहेत.
ट्रम्प जुनाट युद्धखोर: इराण
कोणताही इराणी अधिकारी व्हाइट हाऊसच्या दरवाजापुढे झुकलेला नाही. ट्रम्प यांच्या खोटे बोलण्यापेक्षा आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला बाहेर काढण्याची भित्रेपणाने दिलेली धमकी. इराण दबावाखाली चर्चा करत नाही, अशा दबावाखाली शांतता स्वीकारत नाही, आणि प्रसिद्धीसाठी प्रयत्न करत आहेत अशा जुनाट युद्धखोर व्यक्तीबरोबर आम्ही चर्चा करत नाही.