"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:09 IST2026-01-09T17:08:37+5:302026-01-09T17:09:26+5:30
खामेनेई म्हणाले, परकीय शक्तींच्या वरदहस्ताने धुडगूस घालणाऱ्या हस्तकांना अथवा ऑपरेटिव्सना इराण कधीही खपवून घेणार नाही.

"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
इराणमधील जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. बहुतांश इराणमध्ये अशांततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज (९ जानेवारी २०२६) इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी देशाला संबोधित केले. तेथील सरकारी टीव्ही चॅनेलने त्यांचे भाषण प्रसारित केले आहे. तेहरानसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तसेच, ग्रामिण भागांतही त्यांचे हे भाषण प्रसारित झाले आहे. आपल्या भाषणात खामेनेई यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट प्रत्युत्तर देत, देशातील समस्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
खामेनेई म्हणाले, परकीय शक्तींच्या वरदहस्ताने धुडगूस घालणाऱ्या हस्तकांना अथवा ऑपरेटिव्सना इराण कधीही खपवून घेणार नाही. काही दंगेखोर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत अमेरिकन अध्यक्षांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या देशाची काळजी करावी. इराण परकीय दबावापुढे झुकणार नाही."
"संघटित राष्ट्र कुठल्याही शत्रूला पराभूत करू शकते" -
याचवेळी खामेनेई यांनी इराणच्या तरुणांना संघटित राहण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, "संघटित रहा. तयारीत रहा. कारण संघटित राष्ट्र कुठल्याही शत्रूला पराभूत करू शकते. स्वतःच्या देशाचे रक्षण करणे, हे आक्रमण नसून साम्राज्यवादाविरोधातील धाडस आहे." एवढेच नाही तर, "हा परकीय कट आहे. हे सर्व अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित एजंट्सचे काम आहे," असेही खामेनेई म्हणाले.
AP च्या वृत्तानुसार, "खामेनेई यांनी ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला खूश करण्यासाठी आंदोलक आपल्याच देशातील रस्ते खराब करत आहेत. शत्रूला याचे परिणाम भोगावे लागतील. याशिवाय, एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, खामेनेई यांनी ट्रम्प यांना 'अहंकारी' म्हणत, त्यांचे हात इराणच्या जनतेच्या रक्ताने माखले असल्याचेही म्हटले आहे. तसेच, ट्रम्प यांना सत्तेवरून खाली खेचले जाईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.