३ इस्लामिक देश मिळून इराणवर हल्ला करणार?; युद्धात अमेरिका-इस्रायलला आणखी बळ मिळण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:23 IST2026-03-07T13:22:48+5:302026-03-07T13:23:36+5:30
जर या तिन्ही देशांनी इराणवर हल्ला केला तर २ मोर्चा उघडपणे खुले होतील. आतापर्यंत इस्रायल आणि अमेरिका हवाई हल्ले करत आहे परंतु अझरबैजान आणि पाकिस्तान जमिनीवरून हल्ले करू शकतात

३ इस्लामिक देश मिळून इराणवर हल्ला करणार?; युद्धात अमेरिका-इस्रायलला आणखी बळ मिळण्याचे संकेत
रियाध - गाझामधील नरसंहार विसरून पाकिस्तान आता सौदी अरेबिया आणि अझरबैजानसोबत मिळून इराणवर हल्ला करू शकतो. सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांनी रावलपिंडीत पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी संरक्षण करार एक्टिव्ह करण्यावर भाष्य केले. त्यामुळे आता पाकिस्तानवर इराणविरोधात मोर्चा उघडण्यासाठी प्रचंड दबाव वाढला आहे. इराणने अझरबैजानच्या नखचिवन हवाई तळावर ड्रोन हल्ला केला आहे. त्याशिवाय सौदी अरेबियातील तेल रिफायनरी आणि रियाधवर मिसाइल हल्ले केले आहेत.
सौदी अरेबियाच्या किंगडमला इराणी मिसाईल त्यांच्या शाही परिवाराला टार्गेट करू शकतात अशी शंका आहे. त्यानंतर सौदीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा खूप प्रमाणात वाढवली आहे. यातूनच सौदीचे संरक्षण मंत्री मदत मागण्यासाठी पाकिस्तानला पोहचले. अझरबैजानने आधीच इराणला इशारा दिला आहे. शिया इराणविरोधात सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि अझरबैजान मोर्चा उघडू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ते यहुदी देश इस्रायलची मदत करू शकतात.
३ इस्लामिक देश इराणवर हल्ला करणार?
सौदी-पाकिस्तान संरक्षण करार - सप्टेंबर २०२५ रोजी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला होता. या करारानुसार कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. परंतु पाकिस्तानने सध्या इराणविरुद्ध युद्धात थेट न उतरता राजनैतिक धोरण अवलंबले आहे. परंतु सौदी अरेबिया आता अधिक दबाव तयार करत आहे.
अझरबैजानची भूमिका काय? - अझरबैजान आणि इस्रायल यांच्यात खूप मजबूत संरक्षण संबंध आहेत. इस्रायल त्यांचे आधुनिक शस्त्रे अझरबैजानला पुरवठा करते. इस्रायलसोबत असलेल्या याच संबंधातून इराणने अझरबैजानच्या नखचिवन एअरपोर्टवर ड्रोन हल्ला केला. त्यात ३ जण जखमी झालेत. या हल्ल्याचा निषेध करत अझरबैजानेही इराणला इशारा दिला आहे.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणकडून सौदीसह इतर देशांमधील ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. आता सौदी अरेबिया आणि अझरबैजान यांनी इस्रायलशी थेट संबंध असल्याचे दाखवण्याऐवजी त्यांच्या "सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेच्या" नावाखाली इराणला विरोध केला आहे. त्यातून इस्रायलची बाजू घेतल्यासारखे दिसू नये आणि देशातील नागरिकांचा विरोध होऊ नये म्हणून ही एक हुशार रणनीती वापरली आहे. इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या पाकिस्तानला आता ज्यू राष्ट्राला पाठिंबा देण्यास भाग पाडले जात आहे. पाकिस्तानने जर मोर्चा उघडला तर इराण आणखी अडचणीत येईल.
Met with Pakistan’s Chief of Army Staff and Chief of Defense Forces, Field Marshal Asim Munir. We discussed Iranian attacks on the Kingdom and the measures needed to halt them within the framework of our Joint Strategic Defense Agreement. We stressed that such actions undermine… pic.twitter.com/OuELnf9LU6
— Khalid bin Salman خالد بن سلمان (@kbsalsaud) March 7, 2026
जर या ३ देशांनी इराणवर हल्ला केला तर काय परिणाम होतील?
इराणची सीमा पाकिस्तान आणि अझरबैजान या दोन्ही देशांना जोडलेली आहे. जर या तिन्ही देशांनी इराणवर हल्ला केला तर २ मोर्चा उघडपणे खुले होतील. आतापर्यंत इस्रायल आणि अमेरिका हवाई हल्ले करत आहे परंतु अझरबैजान आणि पाकिस्तान जमिनीवरून हल्ले करू शकतात. त्यामुळे इराण एकाचवेळी अनेक मोर्चांवर अडकेल. भौगोलिकदृष्ट्या इराण चहुबाजूने वेढला जाईल. अझरबैजान उत्तरेतून, सौदी अरेबिया दक्षिण पश्चिम आणि पाकिस्तान पूर्वेकडून हल्ला करेल. इराणची डिफेन्स प्रणाली जी जवळपास संपुष्टात आलेली आहे ती या तिन्ही देशांचे हल्ले एकाचवेळी रोखण्यास अपयशी ठरेल. इराण आणि पाकिस्तानला अरबी समुद्रही आहे. सौदी अरेबिया आणि त्यांचे सहकारी पर्शियन आखातात इराणच्या नौदलाला टार्गेट करू शकतात.
पाकिस्तानला डबल फायदा
इराणविरोधात युद्धात उतरल्यास पाकिस्तानला डबल फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानला सौदी अरेबिया आणि अमेरिका दोघांकडून डॉलरमध्ये मदत होऊ शकते. पाकिस्तानात भलेही अंतर्गत विद्रोह असतील परंतु पाकिस्तानी सैन्यासाठी कोट्यवधी डॉलरसाठी हजार दोन हजार लोकांना मारणे चांगला सौदा होऊ शकतो. डॉलरसाठी पाकिस्तान कुठल्याही पातळीला जाऊ शकते. त्यामुळे आगामी काळात काय होते हे पाहणे गरजेचे आहे.