पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:17 IST2025-12-06T11:16:47+5:302025-12-06T11:17:25+5:30
दिल्लीत पुतिन यांच्या स्वागतासाठी 'रेड कार्पेट' अंथरले गेले, पण या दौऱ्यामुळे सर्वात जास्त अस्वस्थता शेजारी देशात दिसून येत आहे.

पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीत पुतिन यांच्या स्वागतासाठी 'रेड कार्पेट' अंथरले गेले, पण या दौऱ्यामुळे सर्वात जास्त अस्वस्थता इस्लामाबादमध्ये दिसून येत आहे. एकीकडे पाकिस्तान तणावात असताना, त्याचा एक शेजारी देश मात्र या भेटीमुळे खूप आनंदात आहे. हा देश दुसरा तिसरा कुठला नसून अफगाणिस्तान आहे. या देशात सध्या तालिबान सरकार आहे. ज्या तालिबानला आजही जग अधिकृत मान्यता देण्यास कचरत आहे, त्याच तालिबानचा आनंद भारत आणि रशियाच्या बदललेल्या धोरणांमुळे द्विगुणित झाला आहे.
पुतिन यांचे तालिबानबद्दल मोठे विधान
दिल्लीत भारतीय माध्यमांशी संवाद साधताना पुतिन यांनी तालिबानबद्दल एक धक्कादायक पण स्पष्ट संदेश दिला. पुतिन म्हणाले की, "तालिबानने देशावर संपूर्ण नियंत्रण ठेवले आहे. हे वास्तव आहे आणि ते स्वीकारले पाहिजे." पुतिन यांनी तालिबानचे कौतुक करताना दावा केला की, ते दहशतवादावर कारवाई करत आहेत, ISIS आणि इतर दहशतवादी नेटवर्कवर हल्ला करत आहेत आणि अफूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी केले आहे.
भारत-रशियाची सामायिक रणनीती
दिल्लीत झालेल्या २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेत दोन्ही देशांनी अफगाणिस्तानवर अभूतपूर्व समन्वय साधला. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्ध सर्वसमावेशक आणि प्रभावी धोरण तयार केले जावे. ISIS सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई व्हावी. मानवी मदत कोणत्याही अडथळ्याशिवाय अफगाणिस्तानमध्ये पोहोचावी. सुरक्षा परिषदांमध्ये नियमित संपर्क कायम राहावा.
तालिबानसाठी हे संयुक्त मत एका समर्थन पत्रापेक्षा कमी नाही. थोडक्यात, तालिबान खूश आहे कारण, रशियाची औपचारिक मान्यता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर आधार मिळवून देते. तर, भारत-रशियाचा सामायिक पाठिंबा तालिबानला राजकीय वजन देतो.
इस्लामाबाद का चिंतेत?
तालिबानवर रशिया आणि भारताचा वाढता प्रभाव पाकिस्तानची सामरिक पकड कमकुवत करतो. अफगाणिस्तानवर पाकिस्तानची पकड आता ढिली पडताना दिसत आहे. ISIS-K विरुद्ध भारत-रशियाची संयुक्त रणनीती पाकिस्तानच्या प्रादेशिक प्रभावाला मर्यादित करते.