भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:25 IST2025-11-25T17:25:21+5:302025-11-25T17:25:48+5:30
जोहान्सबर्ग येथे नुकत्याच झालेल्या जी२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत दुजोरा दिला आहे.

भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
भारत आणि कॅनडा यांच्यातील अणुऊर्जा सहकार्याला नवी दिशा मिळाली आहे. दोन्ही देश सुमारे २.८ अब्ज डॉलर (२३,४०० कोटी रुपये) किमतीच्या युरेनियम पुरवठा कराराच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहेत. या महत्त्वपूर्ण करारामुळे भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून, हा पुरवठा पुढील सुमारे १० वर्षांपर्यंत सुरू राहू शकतो. जोहान्सबर्ग येथे नुकत्याच झालेल्या जी२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत दुजोरा दिला आहे.
कॅनडा करणार युरेनियमचा पुरवठा
रविवारी जी२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि कार्नी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीनंतर, दोन्ही देशांनी त्यांच्या जुन्या नागरी अणुसहकार्याला पुन्हा एकदा दृढ केले असून ते पुढे नेण्यावर सहमती दर्शवली आहे. कॅनडाची Cameco Inc. ही कंपनी भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे. ही कंपनी कॅनडाच्या सास्काचेवान प्रांतात कार्यरत आहे. Camecoचा भारताच्या अणुऊर्जा विभागासोबत झालेला एक करार २०२० मध्ये संपला होता. हा करार २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या कॅनडा भेटीदरम्यान झाला होता.
सप्टेंबर २०१३ मध्ये लागू झालेल्या कॅनडा-भारत न्यूक्लियर कोऑपरेशन करारानंतरच भारताला वीज निर्मितीसाठी कॅनडाकडून युरेनियम खरेदी करण्याची परवानगी मिळाली होती.
SMRतंत्रज्ञानातही भारताला रस
युरेनियम पुरवठ्याच्या या मोठ्या कराराशिवाय, दोन्ही देशांमध्ये आणखी एका मोठ्या अणुसहकार्य कराराचे संकेत मिळत आहेत. कारण भारत स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात स्वारस्य दाखवत आहे. हे तंत्रज्ञान अणुऊर्जा क्षेत्रात भविष्यातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
ACITI भागीदारी ठरतेय गेमचेंजर
युरेनियम पुरवठ्यावर सुरू असलेली ही बोलणी नुकत्याच स्थापन झालेल्या ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन भागीदारीशी देखील जोडलेली आहे. ही भागीदारी जोहान्सबर्गमध्ये मोदी, कार्नी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या बैठकीनंतर जाहीर झाली. पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, हा उपक्रम तीन खंड आणि तीन महासागरांमधील सहकार्याला अधिक बळकट करेल.
या भागीदारीचा उद्देश तिन्ही देशांमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, पुरवठा साखळी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासाला चालना देणे आहे. भारत-कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०२४ मध्ये २२.६ अब्ज डॉलर इतका होता, जो कॅनडा २०२५ पर्यंत ७० अब्ज डॉलरपर्यंत नेऊ इच्छित आहे.