जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 08:30 IST2025-12-05T08:26:47+5:302025-12-05T08:30:57+5:30
Duduzile Zuma-Sambudla explained: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धासाठी रशियाला लागणाऱ्या सैनिक भरतीचे धागे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांची मुलगी ‘खासदार’ दुदुजिले झुमा-साम्बुडलापर्यंत पोहोचले आहेत.

जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता चार वर्षे होत आली आहेत, पण अजून हे युद्ध थांबण्याचं नाव नाही. उलट त्यांच्यातील संघर्ष वाढतोच आहे. या युद्धात दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक कामी आले आणि त्यांना सैनिकांची कमतरता भासते आहे. सैनिकांची कमतरता भासू नये यासाठी रशियानं तर अनेक क्लृप्त्या योजल्याचं आणि त्यासाठी त्यांनी देशोदेशी ‘एजंट’ नेमल्याच्याही बातम्या येताहेत.
आता या प्रकरणाचे धागे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांची मुलगी ‘खासदार’ दुदुजिले झुमा-साम्बुडलापर्यंत पोहोचले आहेत. रशियाची सैनिकांची कमतरता भरून काढण्यासाठी झुमानं रशियाची ‘एजंट’ बनून काही तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवलं, त्यांना रशियात पाठवलं आणि त्यानंतर त्यांना बळजबरीनं सैन्यात दाखल करून युद्धावर पाठवण्यात आलं, असा आरोप आहे. या आरोपांमुळे तिनं नुकताच आपला खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
विशेष म्हणजे झुमाची बहीण एनकोसाजाना झुमा-मनक्यूब हिनंच तिच्यावर तरुण पुरुषांना फसवल्याचा आरोप केला आहे. एनकोसाजानानं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की झुमानं काही भामट्यांना हाताशी धरून अनेक तरुणांची फसवणूक केली. त्यासाठी गरजू, गरीब आणि ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे असे तरुण शोधले.
त्यांना पैशांचं, नोकरीचं आमिष दाखवलं. रशियात तुम्हाला एका बड्या सुरक्षा कंपनीत उत्तम पगाराची नोकरी दिली जाईल, असं आश्वासन दिलं. रशियात पोहोचल्यानंतर मात्र या तरुणांना जबरदस्तीनं रशियन भाडोत्री सैनिक गटाकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर त्यांना थातूरमातूर ट्रेनिंग देऊन थेट युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरायला भाग पाडलं गेलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या तरुणांना फसवून रशियाला पाठवण्यात आलं, त्यातील १७ पैकी आठ तरुण तर झुमाच्या बहिणीच्याच नात्यातलेच आहेत!
विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकन सरकारनंही या महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की २० ते ३९ वयोगटातील काही लोकांनी सरकारकडे मदत मागितली आहे. हे लोक युद्धग्रस्त डोनबास प्रदेशात अडकले आहेत. सरकारच्या मते त्यांना चांगल्या पगाराचं आमिष दाखवून सैनिकी दलात सामील करण्यात आलं आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धात मॉस्कोच्या बाजूनं अनेक देशांतील लोक लढत आहेत. यापैकी बरेच चांगल्या नोकरीच्या शोधात रशियात आले होते. नंतर त्यांना फसवून युद्धात ढकललं गेलं. यासंदर्भात रशियावर आधीपासून आरोप होत आहेत की इतर देशांतील लोकांना चांगल्या नोकऱ्यांचं आमिष दाखवून त्यांना तिथे बोलावलं जातं आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीनं युद्धात लढण्यासाठी पाठवलं जातं. भारतातीलही काही तरुणांना फसवून युद्धात लढण्यासाठी पाठवलं गेल्याचा आरोप आहे.
केवळ पुरुषांनाच नाही, तर तरुणींनाही फसवून रशियात आणलं जातं आणि युद्धासंदर्भातली कामं त्यांच्याकडून करवून घेतली जातात, असाही आरोप आता होत आहे. विशेषत: दक्षिण आफ्रिका आणि इतर आफ्रिकन देशांतील तरुणी, महिलांना खाद्यपदार्थ, हॉस्पिटॅलिटी इत्यादी क्षेत्रांत नोकरीचं आश्वासन देऊन नंतर त्यांना फसवून रशियाच्या ड्रोन कारखान्यांत कामाला लावलं जातं, असेही आरोप केले जात आहेत.