अमेरिका की इराण, होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण असेल?; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:51 IST2026-03-24T12:50:20+5:302026-03-24T12:51:45+5:30
अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध थांबवण्याची चर्चा झाली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. इराणने मात्र याबद्दल वेगळी भूमिका मांडली. त्यातच आता ट्रम्प यांनी होर्मुझच्या नियंत्रणाबद्दल नवीन विधान केले आहे.

अमेरिका की इराण, होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण असेल?; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना एक महत्त्वाचे विधान केले. इराणयुद्ध सुरू झाल्यानंतर अत्यंत कळीचा मुद्दा बनलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीबद्दल ट्रम्प यांनी अमेरिकेची भूमिका मांडली. होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण असेल, याबद्दल बोलताना ट्रम्प पत्रकारांना म्हणाले की, "यावर संयुक्त नियंत्रण असेल. कदाचित मी आणि जे पुढचे अयातुल्लाह असतील, अशा दोघांचे यावर नियंत्रण असेल."
इराणमध्ये सर्वोच्च नेत्याला अयातुल्लाह म्हणून संबोधले जाते. त्यानुषंगाने ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. यापुढे होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिका आणि इराण अशा दोन्ही देशांचे नियंत्रण असेल, अशा आशयाचेच विधान त्यांनी केले आहे.
होर्मुझ बंद, तेल-गॅस पुरवठ्यावर परिणाम
अमेरिका आणि इस्रायलने युद्ध छेडल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल-गॅस वाहतुकीवरच निर्बंध आणले. त्याचा फटका भारतासह इतर देशांनाही बसला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल-गॅस पुरवठा ठप्प झाल्याने भारतात गॅस संकट ओढवले आहे. इतर देशांतही याचे परिणाम दिसू लागले आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सगळे देश प्रयत्न करताना दिसत आहेत.
युद्ध थांबवण्यासाठी इराण-अमेरिकेमध्ये चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, "मध्य पूर्वेमध्ये जो संघर्ष सुरू आहे, तो पूर्णपणे संपवण्यासाठी आमच्यात चर्चा झाली आहे. पूर्णपणे समाधानकारक तोडगा काढण्यावर जी चर्चा झाली, ती सकारात्मक होती."
"इराणमधील ऊर्जा पायाभूत प्रकल्प आणि तेल-गॅस साठ्यांवर जे हल्ले केले जात आहेत, ते पुढील पाच दिवस थांबवले जातील. मी यु्द्ध विभागाला सांगितले की आहे, इराणच्या तेल प्रकल्पावर हल्ले टाळण्यात यावे", असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणने मात्र ट्रम्प यांचा चर्चा झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.