पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:57 IST2025-07-25T13:18:55+5:302025-07-25T13:57:17+5:30
ब्रिटीश पंतप्रधानांसोबत चाय पे चर्चा असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या फोटोत मोदींना चहा पाजणाराही दिसत आहे. त्यात हा चहावाला कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यातील फ्री ट्रेड कराराला या दौऱ्यात मंजुरी मिळाली. एफटीएवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर अधिकारी निवासस्थानी चहाचा आनंद घेण्यासाठी गेले. ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी त्यांच्या निवासस्थानी एक चहाचा स्टॉल लावला होता. त्याच स्टॉलवर स्टार्मर यांनी पंतप्रधान मोदींसोबत चहा घेतला. मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामला हा फोटो शेअर केला आहे. ब्रिटीश पंतप्रधानांसोबत चाय पे चर्चा असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या फोटोत मोदींना चहा पाजणाराही दिसत आहे. त्यात हा चहावाला कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली.
पीएम कीर स्टार्मर यांच्यासोबत चाय पे चर्चा...भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध मजबूत करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या फोटोत कीर स्टार्मर आणि नरेंद्र मोदी यांच्याशिवाय आणखी एक व्यक्ती पारंपारिक भारतीय कुर्त्यात दिसून येत आहे जो या दोन्ही नेत्यांना चहा देत आहे. स्टॉलवरच्या बॅनरवर, ताजा मसाला चहा; भारतातून आणला, लंडनमध्ये तयार केला, असा उल्लेख आहे.
हा चहावाला कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा पाजणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे अखिल पटेल.. अखिलला लंडनचा चायवाला म्हणून ओळखले जाते. अखिल यूकेमधील एक उद्योगपती आणि अमाला चहाचे संस्थापक आहेत. ते मूळचे भारतीय असलेले ब्रिटन नागरीक आहेत. अमाला चहा लंडनमधील एक ब्रँड आहे जो भारतीय मसाला चहासाठी प्रसिद्ध आहे. अखिल पटेल यांच्या कुटुंबाचे भारताशी खोल नाते आहे. त्यांची आजी ५० वर्षापूर्वी एका चांगल्या संधीच्या शोधात ब्रिटनमध्ये गेली होती. अखिल पटेल यांचे शिक्षण लंडनमध्येच झाले. हॅम्पस्टेड यूनिवर्सिटी कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँन्ड पॉलिटिकल सायन्समध्ये त्याने मॅनेजमेंटमध्ये बीएससीची पदवी घेतली.
अखिल पटेल यांनी डेटा एनालिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. परंतु २०१९ मध्ये त्यांनी आजीपासून प्रेरणा घेत अमाला चहा अस्तित्वात आणला. हा ब्रँड भारतीय मसाला चहा आणि पारंपारिक नैसर्गिक केंद्रीत चहासाठी प्रसिद्ध आहे. आसाम आणि केरळमधील छोट्या शेतकरी कुटुंबाकडून अखिल पटेल चहा पाने आणि मसाले खरेदी करण्यासाठी भारतात येतात. जेणेकरून मध्यस्थी हटवून उच्च व्यवसाय आणि गुणवत्ता जपता येईल.