इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:26 IST2025-11-27T19:25:40+5:302025-11-27T19:26:03+5:30
Imran Khan Death Row: गृहमंत्र्यांच्या या विधानामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला आणि कामकाज पुढे चालू शकले नाही. दुसरीकडे इम्रान खान यांच्या बहिणी तुरुंगाबाहेर बसून आहेत.

इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या तब्येतीवरून आणि सुरक्षेवरून सुरू असलेला संभ्रम आता थेट पाकिस्तानच्या संसदेत पोहोचला आहे. रावळपिंडीतील अदियाला जेलमध्ये कैद असलेल्या इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नसल्याने पीटीआयच्या खासदारांनी नॅशनल असेंब्लीमध्ये आज जोरदार आवाज उठवला.
इम्रान खान पूर्णपणे ठीक आहेत, असे शहाबाज सरकार आणि जेल प्रशासन वारंवार सांगत असले तरी, इम्रान यांचे कुटुंब आणि पीटीआय पक्ष हे मान्य करायला तयार नाही. पीटीआयचे खासदार फैजल जावेद यांनी संसदेत हा मुद्दा जोरजोरात मांडला. "इम्रान खान यांना पूर्णपणे एकांतवासात का ठेवले जात आहे? पुढील २४ तासांत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी," अशी थेट मागणी फैजल जावेद यांनी सरकारकडे केली.
यावर पाकिस्तानचे गृहमंत्री तलाल चौधरी यांनी नियमांचा हवाला देत, 'इम्रान खान हे 'मोस्ट व्हीआयपी कैदी' आहेत. त्यांना जेलच्या मॅन्युअलनुसारच भेटण्याची परवानगी दिली जाईल. पीटीआय यावर नाट्य करत आहे,' असे विधान केले.
गृहमंत्र्यांच्या या विधानामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला आणि कामकाज पुढे चालू शकले नाही. दुसरीकडे इम्रान खान यांच्या बहिणी तुरुंगाबाहेर बसून आहेत. चाहते, कार्यकर्ते एकदा इम्रान खानना भेटुद्या अशी मागणी करत आहेत. यावरून येत्या काळात पाकिस्तानात यादवी माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.